अकोला : रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला ‘गिफ्ट’ देत असतो. आज रक्षाबंधनाच्यानिमित्त मात्र राज्य शासनाने शेतकरी भावांना मोठे ‘गिफ्ट’ दिले. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आला आहे.

तीन महिन्यांपासून प्रक्रिया

राज्य शासनाने गत २ जून २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. वाशीम जिल्ह्यातील ६९४ गावांमधील सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती बँक) तसेच राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खाजगी बँकांच्या एकूण ५४ हजार १०२ पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १७ हजार ३२७ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १५०.०५ कोटींची रक्कम जमा झाली आहे. यासह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४३ हजार ६६० शेतकऱ्यांच्या खात्यात ३७४.९१ कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दुसऱ्या टप्प्यातील निधी  तपशील

शासनाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात आला. यामध्ये एकूण लाभार्थी शेतकरी १७ हजार ३२७ असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सात हजार ०९१ शेतकरी आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या १० हजार २३६ शेतकरी खातेधारकांना लाभ झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेला ५६.४३ कोटी, तर राष्ट्रीयीकृत बँकेला ९३.६२ कोटी रुपये वितरीत केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ६९८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, त्यापैकी ४३ हजार ६६० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दोन्ही टप्पे मिळून ३७४.९१ कोटी रुपये जमा झाले.

७ हजार ४०४ पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित 

कर्ममुक्ती योजनेंतर्गत अद्यापही ७ हजार ४०४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण ‘ॲग्रीस्टॅक फार्मर’ आयडी नोंदणी अभावी बाकी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे, त्यांनी आपला विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे भेट द्यावी आणि त्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक माणिकराव लटपटे यांनी केले. अद्यापही हजारो पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा राहणार असून त्यांचे तिसऱ्या टप्प्याकडे लक्ष राहील.