Akola Washim highway accident : अकोला : मजुरांना घेऊन निघालेल्या मालवाहू वाहनाला मोटारीने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १० मजूर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना वाशीम-अकोला महामार्गावरील मेडशी वळण मार्गावर गुरुवारी सकाळी घडली. हळद काढणीच्या कामासाठी १० महिला मजुरांची मालवाहू वाहनातून वाहतूक केली जात होती. संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
उभ्या वाहनाला मागून दिली धडक
वाशीम जिल्ह्याच्या मेडशी येथील काही महिला मजूर जवळच असलेल्या रिधोरा येथे हळद काढणीच्या कामासाठी जाण्यासाठी मालवाहू वाहनात (क्रमांक एमएच -०८ एजी-०९६७) बसून होत्या. हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे असतानाच वाशीमकडून अकोल्याच्या दिशेने अत्यंत वेगाने जाणाऱ्या मोटारीने (क्रमांक जीजे १९ बीजे २०००) या उभ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटार रस्त्यावरच उलटली, तर उभ्या असलेल्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. यामध्ये वाहनात बसलेल्या १० महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले
सर्व जखमी महिलांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वाशीम आणि अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमी महिला मेडशी येथील रहिवासी असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीच्या कामाला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे मेडशी परिसरात मोठी खळबळ उडाली.
भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढली; वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न
महामार्गावरून भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोला ते हैदराबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अनेक वेळा वाहनांच्या वेगावर चालकाचे नियंत्रण राहत नसल्याने अपघात घडतात. याच प्रकारे मेडशी येथे उभ्या मालवाहू वाहनाला मोटारीने जोरदार धडक दिली. या अपघातात मजूर महिला जखमी झाल्या आहेत. महामार्गावरील वाहनांच्या वाढत्या वेगावर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकीकडे परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार वाशीम जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण व अपघाती मृत्यूची संख्या कमी होत असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे जिल्ह्यात सातत्याने अपघात घडत असून वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
