अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे ‘ओडीएफ प्लस मॉडेल’ करण्यात यंत्रणेची प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. गत सहा महिन्यांत एकाही गावात याची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता आगामी ३० दिवसांमध्ये १०० गावे ‘मॉडेल’ करण्याचे आव्हान राहणार आहे.

‘ओडीएफ प्लस मॉडेल’ म्हणजे काय?

‘ओडीएफ प्लस मॉडेल’ मध्ये गावातील एकूण स्वच्छता पातळी वाढविण्यावर भर दिला जातो. या अंतर्गत गावातील सर्व व्यक्ती शौचालयाचा वापर करीत असल्याची पडताळणी केली जाते. गावात जमा होणाऱ्या ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते. गावातील सांडपाणी रस्त्यावर किंवा उघड्यावर साचणार नाही, यासाठी शोषखड्डे किंवा सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी दृश्यमान स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सुरू करण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

वाशीम जिल्ह्यात प्रलंबित कामे करण्यास टाळाटाळ

वाशीम जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत कार्याचा आढावा घेतला. ‘ओडीएफ प्लस मॉडेल’साठी आवश्यक असलेली प्रलंबित कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. सहा तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिला. पुढील ३० दिवसात शंभर गावे ‘ओडीएफ प्लस मॉडेल’ घोषित करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले. रिसोडमधून पाच आणि मानोरा तालुक्यातील १५ गावे आणि उर्वरित सर्व तालुक्यांना प्रत्येकी २० गावे ‘मॉडेल’ करण्याचे लक्ष्य दिले आहे. त्याचे सुक्ष्म नियोजन करून दिले.

“स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु”ची विशेष जनजागृती

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची काटेकोर अंमलबजावनी गावस्तरावर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शासनाच्या निर्देशानुसार “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु” ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे सूचित केले. दरम्यान, शासनाकडून निधी न आल्यामुळे जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यापासून वेतन थकीत आहे. या संदर्भात राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी पाठविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. पुढील आठ दिवसात निधी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून देण्यात आली. त्यामुळे अभियानाला गती देण्याचे सूचित केले.