अकोला : जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे गंभीर संकट निर्माण आले. आता शहरात महापालिकेकडून ११ व्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. त्यानुसार नवीन विहीर, कूपनलिका खोदण्यासह पाण्याच्या व्यावसायिक उपशावर बंदी घालण्यात आली आहे.
अत्यल्प प्रमाणात पर्जन्यमान
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसावर गंभीर परिणाम झाला. पावसाळ्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पर्जन्यमान झाले. पावसाची मोठी तूट आहे. खरीप हंगाम उद्ध्वस्त होण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) असून त्यातील उपयुक्त जलसाठा १६.२९ दलघमी असून त्याची टक्केवारी १८.८७ टक्के आहे. सद्यस्थितीत अपुऱ्या पावसामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठ्यामध्ये लाक्षणिक स्वरूपात घट होत आहे. त्यामुळे सात दिवसाआड आठव्या दिवशी सुरू असलेला पाणी पुरवठा आता १० दिवसाआड ११ व्या दिवशी करण्यात आला. त्यामुळे आता हिवाळ्यातच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
नवीन विहीर अथवा कूपनलिका खोदण्यास बंदी
जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागांत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटरच्या परिघात कोणत्याही खासगी किंवा व्यावसायिक वापरासाठी नवीन विहीर अथवा कूपनलिका (बोअरवेल) खोदण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंत्राटदारांविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ आणि ‘महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९’ नुसार कडक फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा देण्यात आला.
जलसाठ्यातील पाणी उपासा करण्यास बंदी
जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे शासकीय जलप्रकल्प, नद्या, नाले आणि बंधाऱ्यांमधून उद्योग किंवा व्यावसायिक कारणांसाठी पाणी उपसा करण्यास तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. उपलब्ध पाणी साठा केवळ पिण्यासाठी आणि टँकर भरण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.
बांधकामासाठी नळाच्या पाण्याचा वापर नाहीच
कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी महापालिकेच्या नळाच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. कार वॉशिंग सेटर, सर्विस सेंटर, हॉटेल, लॉज, मंगल कार्यालय, स्वीमिंग पूल, बाग यांनी महापालिका नळाचा वापर करू नये. या वापरासाठी अकोला महापालिकेच्या शिलोडा व पी.के.व्ही. परिसरातील मलशुद्धीकरण केंद्रावरून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे अनिवार्य राहील, असे महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी स्पष्ट केले.
