अकोला : भर पावसाळ्यामध्ये अकोलेकरांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला. पाणी साठ्यात होत असलेली घट लक्षात घेता महापालिकेने पाणी कपातीला सुरुवात केली. शहरातील काही भागात सहाव्या दिवशी, तर हद्दवाढीच्या भागांमध्ये सातव्या दिवशी पाणी पुरवठा केला जाणार आहे. उन्हाळ्यानंतर आता पावसाळ्यात देखील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

काटेपूर्णा प्रकल्पात १८.३५ टक्के पाणी साठा

अकोला महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्त्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) आहे. या प्रकल्पामध्ये १५ जुलै रोजी १५.८४८ दलघमी पाणी साठा उपलब्ध आहे. प्रकल्पाच्या एकूण साठवण क्षमतेच्या १८.३५ टक्के पाणी साठा आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली. जून महिन्यात देखील सरासरी एवढा पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर पुन्हा वातावरणात बदल झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली.

पाणीसाठ्यात घसरण, तर मागणीत वाढ

सद्यस्थितीत अत्यल्प पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी घसरत आहे. दुसरीकडे पाण्याची मागणी वाढली. दिवसेंदिवस धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठ्या स्वरूपात स्वरुपात घट होत आहे. त्यामुळे शहरात चार दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा १६ जुलैपासून सहाव्या दिवशी करण्यात येणार आहे. ६५ एमएलडी प्रकल्पावरील महाजनी, मोठी उमरी, गुडधी, नेहरु पार्क, तोष्णीवाल, आदर्श कॉलनी, केशव नगर, रेल्वेस्थानक, गंगा नगर, अकोट फैल, जोगळेकर प्लॉट, लोकमान्य नगर आदी ठिकाणच्या जलकुंभावरुन होणारा मुळ हद्दीतील पाणी पुरवठा सहाव्या दिवशी होणार आहे.

हद्दवाढ भागात सातव्या दिवशी पाणी पुरवठा

हद्दवाढ भागातील मलकापुर, शिवापूर, खडकी, शिवर, उमरी, गुडधी, न्यू तापडीया नगर, हिंगणा, सोमठाणा, गिता नगर, गंगा नगर, अयोध्या नगर, मेहरे नगर, गजानन नगर, आश्रय नगर, डाबकी आणि २५ एलएलडी जलशुध्दीकरण केंद्रावरुन शिवनगर जलकुंभ, आश्रय नगर जलकुंभ, बस स्टॅन्ड जलकुंभ, शिवणी जलकुंभ वरुन होणारा पाणी पुरवठा सातव्या दिवशी होणार आहे. शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. शहरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करुन पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन कार्यकारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी केले.