अकोला : उन्हाळा सुरू होताच अकोला शहराला पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. जलसाठ्यातील घटत चाललेला साठा लक्षात घेता अकोला महापालिकेकडून पाणी कपात केली. आता चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केला जाणार आहे. उन्हासोबतच पाणी टंचाईने नागरिकांची होरपळ होणार आहे.
यंदा उन्हाची तीव्रता मार्च महिन्यातच झपाट्याने वाढत आहे. अकोल्यात तापमानाने ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. उन्हाचे तीव्र झळा बसत असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली. पुढील काळात उष्मालाट उद्भवण्याचा अंदाज आहे.
पाणी पुरवठा आता चौथ्या दिवशी; काटेपूर्णा प्रकल्पामध्ये ३९.०४९ दलघमी साठा
वाढत्या तापमानासोबतच अकोलेकरांना आता पाणी टंचाईचा देखील सामना करावा लागणार आहे. शहरात ६५ एम.एल.डी. प्रकल्पावरून होणारा पाणी पुरवठा आता चौथ्या दिवशी केला जाईल. महापालिका पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्त्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) आहे. १२ मार्च रोजी प्रकल्पामध्ये ३९.०४९ दलघमी साठा उपलब्ध आहे.
तापमानामुळे जलसाठ्याचे बाष्पीभवन
सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असून शहरामध्ये तीव्र उन्हाळा जाणवत आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढली. सोबतच प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे जलसाठ्याचे बाष्पीभवन होत आहे. यामुळे दिवसेंदिवस धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. पाण्याची मागणी आणि होत असलेले बाष्पीभवन लक्षात घेता अकोला महापालिका प्रशसनाद्वारे अकोला शहरात दोन दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा १३ मार्चपासून तीन दिवसाआड म्हणजेच चौथ्या दिवशी करण्यात आला आहे. यामुळे ६५ एमएलडी प्रकल्पावरील महाजनी, मोठी उमरी, गुडधी, नेहरु पार्क, तोष्णीवाल, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वेस्थानक, गंगा नगर, अकोट फैल, जोगळेकर प्लॉट, लोकमान्य नगर आदी जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा चौथ्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी दिली. शहरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणुक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले आहे.
पाण्यासाठी भटकंती
अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणू लागली आहे. त्यातच आता शहरी भागात देखील पाणी कपातीमुळे नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे.
