अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदारांनी दुहेरी मतदान केल्याचा आरोप करून काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या निवडीला भाजप नेते विजय अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एकाच मतदारांनी दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान केल्याप्रकरणी याचिका असून हा मुद्दा कायद्याने प्रतिबंधित नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी न्यायालयाने ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

विजय अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमध्ये तीन हजार ६१४ मतदारांनी दुहेरी मतदान केल्याचा दावा केला. एक हजार ११५ मतदारांची नावे एकाच वेळी अकोला पश्चिम आणि बाळापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत होती. त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले. अकोला पश्चिममध्ये त्या मतदारांनी साजिद खान पठाण यांच्या बाजूने मतदान केले. यामुळे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ६२ (३) आणि ६२ (४) नुसार ही निवडणूक अवैध ठरते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. प्रतिवादीकडून मतदार यादीला आव्हान देता येत नसल्याचा अर्ज न्यायालयात केला. न्यायालयाने तो फेटाळला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आमदार पठाण व इतरांनी विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. हस्तक्षेप करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयानेही ती याचिका फेटाळली.

सर्व मतदान केंद्रांचे अर्ज १७ ए मागवले; सात मुद्दे निश्चित

सर्व पक्षकारांनी १५ दिवसांच्या आत साक्षीदारांची यादी द्यावी. अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी अकोला पश्चिम आणि बाळापूरमधील सर्व मतदान केंद्रांचे अर्ज १७ ए, मतदार याद्या आणि सीसीटीव्ही चित्रीकरण चार आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एक हजार ११५ मतदारांची नावे दोन्ही मतदारयाद्यांमध्ये एकाचवेळी आहेत का? या मतदारांनी दोन्ही मतदारसंघात मतदान केले का? तीन हजार ६१४ मतदारांची नावे एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत का? त्यांनी एकापेक्षा जास्त वेळा मतदान केले का? अवैध मतांची गणना झाल्यामुळे निकाल प्रभावित झाला का? मतदान केंद्र क्र. २०३ शिवाजी हायस्कूलमधील ४७३ मतांची मोजणी झाली नाही आणि त्यामुळे निकालावर परिणाम झाला का? निवडणूक रद्द होणार का? हे सात मुद्दे न्यायालयाने उपस्थित केले आहेत. या प्रकरणात आता पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे.