अकोला : विधवा महिलेच्या पैशांवर डोळा ठेऊन आरोपीने जवळीक साधली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने गळा आवळून महिलेची हत्याच केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे.खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या दीपाली राहुल टाले (वय ४० वर्ष रा. खडकी, अकोला) यांचा ५ मार्चला मृत्यू झाल्याची नोंद सर्वोपचार रुग्णालयाच्या पोलीस चौकीत झाली. उत्तरीय तपासणी अहवालामध्ये महिलेचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तत्काळ सखोल तपासाचे आदेश दिले.
नेमकं घडलं काय?
पथक गठीत करून तपास सुरू झाला. मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या दिवशी मृतक महिलेचा कोणाशी वाद झाला होता का? याची माहिती पोलिसांनी घेतली. दरम्यान, ६ मार्चला अमित मिश्रा यांनी खदान पोलीस ठाण्यात येऊन संशयित शाह अजिम शाह (रा.चोहट्टा बाजार) याचे विरुद्ध फिर्याद दाखल केली. महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाल्याने ती आपल्या मुलांसह राहत होती. संशयित आरोपीने महिलेशी ओळख वाढवली.
घटनेच्या दिवशी आरोपी घरी आला अन्…
घटनेच्या दिवशी मृतक महिलेच्या घरी आला होता. त्याने महिलेसोबत वाद घातला. त्यातून आरोपीने महिलेचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो महिलेचा मोबाइल व १४ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाला.
आरोपीला अटक करण्यासाठी दोन तपास पथके तयार करण्यात आले. पोलीस पथकाने आरोपीच्या घरी झाडाझडती घेतली. अंजनगाव, अकोट, चोहट्टा बाजार परिसरामध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला. तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा कसून शोध घेण्यात आला. पथकाने आरोपीला अकोट येथून ताब्यात घेतले. त्याला खदान पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.
महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी
या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयापुढे हजर करून पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, सपोनि योगेंद्र मोरे, ए.एस.आय संजय वानखडे, ए.एस.आय दिनकर धुरंधर, पोहवा निलेश खंडारे, पोहवा गिरीष विर, पोहवा अमित दुबे, पोकॉ संदिप काटकर, भुषण मोरे, काळुराम पवार, अभिमन्यू सदांशिव, वैभव कस्तुरे व गोपाल जाधव यांनी केली. हत्येच्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
