अकोला : पती-पत्नीमधील नाते हे प्रेम, विश्वास, आदर आणि सहकार्यावर आधारलेले एक पवित्र व अत्यंत घट्ट बंधन असते. पतीच्या संकटसमती पत्नी ढाल बनून उभी असते. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. अकोल्यातील आधुनिक सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवले आहेत. शरीराचा भाग देत पत्नीकडून पतीला नवजीवन प्राप्त झाले.
पोटदुखीचा त्रास आणि गंभीर आजाराचे निदान
अकोल्यातील प्रशांत इंगळे हे केबल टाकण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररित्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, लाखो रुपयांचा उपचार खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता.
कठीण परिस्थितीत पत्नीची धावपळ
या कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्यातील आमदारांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची माहिती देत मुंबईत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.
यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे होते अशक्य, पण…
आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे प्रशांत इंगळे (४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात २५ जून २०२६ रोजी यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने १३ जुलै रोजी प्रशांत इंगळे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत. वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे जीव वाचल्याची भावना इंगळे कुटुंबीयांनी व्यक्त केली.
असा उभारला निधी अन् यकृत प्रत्यारोपण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी दोन लाख रुपयांची मदत मंजूर केली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदतही उपलब्ध झाली. त्यामुळे एकूण २१ लाख ६० हजार रुपयांचा निधी उभारला गेला आणि अत्यंत खर्चिक असलेले यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.
