अकोला : एका कॉस्मेटिक दुकानदाराने आपल्या साथीदारांसह अश्लील चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. धर्मांतर करण्यासाठीही त्या पीडित महिलेवर आरोपींनी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार घडला. अत्याचार असह्य झाल्याने पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली.
शहरातील गांधी मार्गावर कॉस्मेटिक दुकान आहे. या दुकानाच्या संचालकाने ग्राहक असलेल्या एका महिलेचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला. त्यावर तो वारंवार संपर्क साधत होता. दुकानात नवीन माल आणल्याचे कारण करून त्याने महिलेला दुकानात बोलावून घेतले. दरम्यान, त्याने आपल्या साथीदारांसह बळजबरी अत्याचार केला. त्याची चित्रफित तयार केली. ती चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन चार नराधमांनी महिलेवर २०२४ ते २०२६ दरम्यान वारंवार अत्याचार केला. त्यानंतर विवाहित महिलेवर धर्मांतर करण्याचा दबाव देखील टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. धर्मांतर केले तर अश्लील चित्रफित डिलिट करू, असे आरोपी महिलेला म्हणाले.
आरोपींकडून सातत्याने अत्याचाराचे प्रकार वाढत असल्याने तणावातून पीडित महिलेने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहर कोतवाली पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी रहेमान उर्फ मोहम्मद मुस्तफा, चंदू राजू वानखडे, रहेमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तस्लीम तेली यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तपासाची सूत्रे वेगाने फिरवत गुन्हा दाखल झालेल्या एकूण चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात पुढील तपास शहर कोतवाली पोलीस करीत आहेत.
इतरही काही महिला अत्याचाराच्या बळी?
गांधी मार्गावरील कॉस्मेटिक दुकानदाराने आपल्या साथीदारांसह एका महिलेला धमकी देऊन तब्बल दोन वर्ष वारंवार अत्याचार केल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणामुळे मुली, तरुणी व महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे. या प्रकरणातील आरोपींनी इतरही काही महिलांना आपल्या जाळ्यात ओढून अत्याचार केला आहे का? या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत. अत्याचारासह धर्मांतरासाठी सुद्धा पीडित महिलेवर दबाव टाकल्याच्या गंभीर प्रकरणाने शहर चांगलेच हादरले आहे.

