अकोला : शहरातील रणपिसे नगर परिसरातील एका रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित रुग्णाचे कागदपत्रे देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे संतापाचा उद्रेक होऊन नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. संबंधित डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकं घडलं काय?

रणपिसे नगर परिसरातील यज्ञा रुग्णालयात एका महिलेला प्रसुतीसाठी दाखल केले होते. काल महिलेची प्रसूती झाली. महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतर महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याचे सांगण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी ‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाला.

डॉक्टरांकडून समाधानकारक उत्तर नाही; नातेवाईकांचा संताप 

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी उपचारासंदर्भातील कागदपत्रांची मागणी संबंधित डॉक्टरांकडे केली. मात्र, डॉक्टरांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत आणि कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. रुग्णालयावर दगडफेकही केली. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिस्थिती नियंत्रण आणली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून नातेवाईकांची समजूत काढली.

पोलीस ठाण्यात तक्रार

महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली. डॉक्टरांकडे महिला रुग्णावर केलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती व कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केल्याचे सांगण्यात आले. कागदपत्रे देण्यास का टाळले जात आहे? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली.

तपासातून नेमके कारण समोर येण्याची शक्यता

प्रसुतीनंतर महिला रुग्णाच्या मृत्युचे नेमके कारण काय? आणि उपचारात खरंच हलगर्जीपणाचा झाला आहे का? हे पुढील तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रकरणाचा सखोल तपास करण्याची आग्रही भूमिका मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतली. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.