लोकसत्ता टीम
अकोला : ठाणे येथे आयोजित राज्यस्तरीय अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत अकोल्यातील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ च्या चमूने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. संघाला पुरस्कार व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.




‘रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल’च्या वतीने अंध खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोंकण, पुणे आदी विभागातील ३२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अकोल्याच्या संघात कर्णधार शंकर अगमकर यांच्या नेतृत्वात खेळलेल्या या संघात अनिकेत काटोले, अक्षय कोकणे, प्रशांत पाखरे, एकनाथ किनवटकर, सुमित गोपनारायण, श्याम पवार, उमेश जाधव, नितेश भोजने, अमर कांबळे, मनोज पडोळे आदी खेळाडूंचा समावेश होता.
आणखी वाचा- चीन, सिंगापूरसह इतर देशांच्या तुलनेत भारतात मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण कमी, पण…
या सर्व खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करून इतर संघांना पराभूत केले. विजेत्या संघाचा ‘नॅब’चे जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे, उपाध्यक्ष राम शेगोकार, उपाध्यक्ष डॉ.नितीन उपाध्ये, सचिव नितीन गवळी आदींसह पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.