अकोला : राजकारण व विचारधारेचे कट्टर विरोधक भाजप आणि ‘एआयएमआयएम’ पक्षांचे नगरसेवक सत्ता समीकरणासाठी एकत्र आल्याचा प्रकार अकोट नगरपालिकेत घडल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ‘एआयएमआयएम’ आणि काँग्रेस नकोच, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतरही भाजप व ‘एआयएमआयएम’मधील अकोट येथील मधुर संबंध काही संपले नाहीत. भाजप नेत्याचे पुत्र ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत पोहोचले. या सर्व घडामोडीनंतर ‘एआयएमआयएम’ पक्षाकडून त्यांच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ‘अगोदर पाठिंबा व नंतर कारवाईचा दिखावा’ अशी सध्या स्थिती आहे. भाजप व ‘एआयएमआयएम’मधील ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

अकोट नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाच्या ३३ पैकी ११ जागांवर भाजप, काँग्रेस सहा, शिवसेना एक, वंचित दोन, प्रहार तीन, राष्ट्रवादी दोन, ‘एआयएमआयएम’ पाच, शिवसेना ठाकरे गट दोन, राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळाली. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपने अकोट विकास मंचाची स्थापना केली. यामध्ये ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांचाही समावेश केला होता. यावरून भाजपवर प्रचंड टीका झाली. मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून आघाडी तोडण्याचे आदेश दिले. या प्रकरणात भाजपने आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला.

दरम्यान, भाजपने ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांना बाहेर ठेऊन २१ जणांचा अकोट नगर विकास मंच नव्याने स्थापन केला. त्यामध्ये शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि प्रहारचा देखील समावेश आहे. दुसरीकडे ‘एआयएमआयएम’ पक्षानेही स्वतंत्र गट स्थापन केला. ‘एआयएमआयएम’ गटाच्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक पदी जितेन बरेठिया यांची निवड झाली.

जितेन बरेठिया यांचे वडील रामचंद्र बरेठिया अकोट नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी २०१९ मध्येच भाजपमध्ये प्रवेश घेतला. अकोट नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रामचंद्र बरेठिया यांनी पत्नीसाठी भाजपकडे उमेदवारी देखील मागितली होती. भाजप नेत्याच्या पुत्राला स्वीकृत नगरसेवक बनवल्याने आता ‘एआयएमआयएम’ पक्षाने त्यांच्या नगरसेवकांना काढणे दाखवा नोटीस बजावली. पाठिंबा दिल्यावर आता नोटीस बजावून काय उपयोग? हा केवळ दिखावा असल्याची टीका होत आहे.