नागपूर : उत्तर प्रदेशातील अयोध्यामधील राम मंदिरात देणगी घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. राम मंदिराच्या न्यासावर पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सुचवलेल्या व्यक्तींचीच नियुक्ती करण्यात आली आहे. हा संपूर्ण घोटाळाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नरजेखाली होत असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अल्का लांबा यांनी रविवारी केला.
आमदार निवास येथे महिला कॉंग्रेसचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, वोट चोरीनंतर आता देणगीच्या रकमेची चोरीचा प्रकार समोर आहे. हा घोटाळा म्हणजे राम भक्तांच्या आस्थेसोबत खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी आरोप होत असलेले सर्व व्यक्ती हे मोदी आणि योगींच्या जवळचे आहे. त्यांच्या नजरेखालीच हा घोटाळा होत राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
संसदेत खोटी माहिती दिली
भाजपचे सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. ऑपरेशन सिंदूर मोहिमेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यानी सभागृहात खोटी माहिती दिली. येत्या जुलै मध्ये संसदेशाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचा जाब विचारण्यात येईल.
दिल्लीत मोठे आंदोलन होईल
नीट पेपरच्या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन बंद होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, नॅश अली, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे उपस्थित होत्या.
महिला आरक्षणासाठी १० लाख पोस्ट कार्ड प्रधानमंत्र्यांना पाठवणार
संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. त्याची आताच अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महिला काॅंग्रेसच्यावतीने पोस्ट कार्ड आणि मिस काॅल मोहीम देशभर राबविली जात आहे. देशभारातून १० लाख पोस्ट कार्ड प्रधानमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे परिसीमन विधेयक हे पडले आहे. महिला आरक्षणाच्या नावावर हे विधेयक पुन्हा एकदा आणण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी देशभरातील पक्षांचे खासदार फोडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षाच नाही
नीट प्रश पत्रिकेनंतर आता टीईटीची प्रश्नपत्रिका फुटली आहे. नीट पेपर लिकचे तार हे भाजपच्या नेत्यांशी जुळले आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांमध्ये भाजपचे नेते आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही. गेल्या १२ वर्षात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या एकाही प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली नाही. उलट अत्याचारातील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
