नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या , अखत्यारितील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे आज मंगळवार आणि उद्या बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून नागपूर तसेच नजीकच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे येथे बस तसेच इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली. याच कारणामळुळे खबरदारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाच्या क्षेत्रात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आदी जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे १६ आणि १७ ऑगस्टला होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.