अमरावती : हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या पुण्यातील नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांच्या वकिलांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अमरावती कारागृह चर्चेत आले आहे. अमरावती कारागृहाच्या पाहणीसाठी आलेले तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी गायकवाड यांना जामीन मिळवून देण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची मागणी केली. फिर्यादी माझे ओळखीचे आहे. पाचशे कोटी रुपये दिल्यास मी तुला बाहेर काढतो, असे त्यांनी सांगितल्याचे गायकवाड यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आले आहे.
गायकवाड प्रकरण काय?
नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना २०२१ मध्ये गणेशच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. गणेशचे लग्न २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलीसोबत झाले होते. मात्र, लग्नानंतर हुंड्यासाठी पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. याशिवाय नानासाहेब यांच्यावर सावकारीविरोधातील अनेक तक्रारींमुळे मकोका कायद्यांतर्गत कारवाई झाली. येरवडा कारागृहात हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांना अमरावती कारागृहात हलविण्यात आले होते.
सुपेकर यांच्यावर आरोप कोणते?
गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. १९ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी गायकवाड यांना जामिनासाठी ५०० कोटी रुपये मागितले. इतर कैद्यांनाही धमकावले आणि वैद्यकीय तपासणी टाळल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
जालिंदर सुपेकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहाला भेट दिली होती. त्यावेळी कारागृहाची सुरक्षा, स्वच्छता आणि बराकींची पाहणी केली. कोणत्याही कैद्याशी बोललेलो नाही. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आणि बदनामीसाठी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कारागृह अधीक्षकांचे स्पष्टीकरण
गायकवाड यांच्या वकिलांनी केलेल्या आरोपांबाबत अमरावती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी आश्चर्य व्यक्त करीत सर्व आरोप फेटाळले आहेत. जालिंदर सुपेकर हे आपले नातेवाईक नाहीत. सुपेकर यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये अमरावती कारागृहाला भेट दिली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये अमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षकपदी पदोन्नतीवर आपली नियुक्ती झाली. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.