नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. पण समितीच्या कामकाजाबद्दल समिती सदस्यांमध्येच नाराजी असून त्यांनी समितीवर मनमानी कामकाजाचा आरोप केला आहे.

केंद्रीय प्रवेश समितीचे सदस्य राजेंद्र बा. झाडे व रवींद्र फडणवीस यांनी शिक्षण उपसंचालकांना २३ जून रोजी पत्र लिहून समितीच्या कामकाजाबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. समितीच्या सभासदांना विश्वासात न घेता प्रशासनच प्रवेशासंबंधी निर्णय सर्व घेत आहेत. संचालकांच्या आदेशानुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करणे अनिवार्य असताना फक्त मोजक्याच व त्यातही शहरातील महाविद्यालयांचीच तपासणी केली जाते. शहरालगतच्या महाविद्यालयात अनियमितता असताना त्यांना संरक्षण दिले जात आहे.

परस्पर महाविद्यालयांच्या तुकड्या वाढवण्यात येत असून शहरात रिक्त जागांचे प्रमाण अधिक असतानाही दरवर्षी काही विशिष्ट महाविद्यायांची प्रवेश क्षमता वाढवली जात आहे. त्यासाठी महाविद्यालयाची भौतिक सुविधा व प्रशिक्षित शिक्षक आहेत अथवा नाही याची शहानिशा केली जात नाही, असे राजेंद्र बा. झाडे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.