अमरावती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पाच ते सहा जण भाजपचे लोक आहेत.भाजपमध्ये थेट प्रवेश करण्याऐवजी राष्ट्रवादीतच राहून या पक्षाला पोकळ करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे, असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे.बच्चू कडू म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून भाजपचे गुण गाणारे काही लोक आहेत. हे राष्ट्रवादीला नुकसान पोहचवत आहेत. राष्ट्रवादीला कमी करण्याची भाजपची खेळी आहे.
भाजपपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. भाजप आपल्या मित्रपक्षांनाच संपविण्याचे काम करीत आहे.बच्चू कडू यांनी याआधीही भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजप म्हणजे विषारी सापासारखा पक्ष आहे. भाजपसोबत न मैत्री बरी, न शत्रूत्व. आम्ही तर शत्रूत्व स्वीकारले आहे. ते कधीही नाग पाठवू शकतात, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी भाजपवर शरसंधान केले होते.
गेल्या २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे.लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात जरी टाकले, तरी लोक म्हणतात, हा मेला, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
पंधराशे रुपये देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी, दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सरकार जनतेचे पैसे लुटत आहे. एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे ही सरकारची नीती आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, तर महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.त्यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन करण्याचे संकेतही दिले आहेत.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.पूर्वी सिव्हिल सर्जनला असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. कमिशनसाठी औषधे महाग केली जात आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणारेच आज टेंडरच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार करत आहेत. ज्या दिव्यांगांना दोन पाय नाहीत, त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आता आली आहे, अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला होता.

