नागपूर : नाओमी ग्रॉसमन या अमेरिकन अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि स्टँड-अप कॉमेडियन असून त्यांनी पारंपरिक सौंदर्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलेल्या धाडसी अभिनयामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९७५ रोजी झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी रंगभूमी, इम्प्रोव्ह कॉमेडी आणि छोट्या चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची पायाभरणी केली. मात्र त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला तो अमेरिकन हॉरर स्टोरी या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेमुळे. या मालिकेतील पेपर ही व्यक्तिरेखा त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की ती टीव्ही इतिहासातील सर्वात लक्षात राहणाऱ्या पात्रांपैकी एक ठरली.
अमेरिकन हॉरर स्टोरी : अॅसाइलम (२०१२) आणि अमेरिकन हॉरर स्टोरी : फ्रिक शो (२०१४) या दोन्ही पर्वांमध्ये पेपरची भूमिका करताना नाओमी ग्रॉसमन यांनी पूर्ण डोके मुंडण केले, चेहऱ्यावर आणि शरीरावर तासन्तास प्रोस्थेटिक मेकअप सहन केला आणि मायक्रोसेफली या आजाराने ग्रस्त व्यक्तींच्या हालचाली, बोलण्याची ढब व भावनिक अवस्था यांचा सखोल अभ्यास करून पात्राला जिवंत केले. त्यांच्या अभिनयातील वैशिष्ट्य म्हणजे केवळ भय किंवा विचित्रपणा दाखवणे नव्हे, तर त्या पात्रामागील वेदना, एकटेपणा आणि माणुसकी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे.
या भूमिकेमुळे त्यांना समीक्षकांकडून मोठी प्रशंसा मिळाली आणि “जोखीम पत्करून भूमिका करणारी अभिनेत्री” अशी त्यांची ओळख निर्माण झाली. अभिनयाबरोबरच नाओमी ग्रॉसमन या सामाजिक प्रश्नांबाबतही जागरूक असून मानसिक आजार, अपंगत्वाविषयीची सामाजिक मानसिकता आणि लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कांवर त्या सातत्याने भाष्य करतात. सौंदर्य, ग्लॅमर किंवा नायिकेच्या ठरावीक साच्यांपेक्षा आशय, अभिनयाची प्रामाणिकता आणि सामाजिक संवेदनशीलता यांना प्राधान्य देणारी अभिनेत्री म्हणून नाओमी ग्रॉसमन यांची कारकीर्द आजही प्रेरणादायी मानली जाते.
१२ वर्षांनंतर वचनपूर्ती
अमेरिकन अभिनेत्री आणि लेखिका नाओमी ग्रॉसमन यांनी अलीकडेच जगातील सर्वात ठेंगणी महिला ज्योती आमगे यांची भेट घेण्यासाठी नागपूरला भेट दिली. दोघींमध्ये खास नातं आहे, कारण त्यांनी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या एफएक्सच्या हॉरर अँथॉलॉजी मालिकेच्या चौथ्या पर्वात, अमेरिकन हॉरर स्टोरी : फ्रिक शो मध्ये एकत्र काम केले होते. नागपुरात ज्योती आमगे यांनी नाओमी ग्रॉसमन यांची मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घेतली आणि त्यांना ‘ऑरेंज सिटी’तील प्रसिद्ध ठिकाणांची सफर घडवली. या भेटीदरम्यान त्यांनी झिरो माईल, श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर आणि दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणांना भेट दिली.
या भेटीबद्दल बोलताना ज्योती आमगे म्हणाल्या, “मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नाओमीने मला वचन दिले होते की ती कधी भारतात आली, तर नक्कीच माझी भेट घेईल. तब्बल १२ वर्षांनंतर तिने आपले वचन पाळले, याचा मला खूप आनंद झाला.” भारत दौऱ्यावर असलेल्या नाओमी ग्रॉसमन यांनी भारतीय संस्कृती आणि येथील लोकांविषयी विशेष प्रेम व्यक्त केले. “नागपूर अतिशय सुंदर आहे. येथे मला खूप छान अनुभव आला. १२ वर्षांनंतर ज्योतीची भेट झाली, याचा मला विशेष आनंद आहे. काश, मी येथे आणखी काही दिवस थांबू शकले असते,” असे त्या म्हणाल्या.
भारत दौऱ्यातील इतर अनुभव सांगताना नाओमी ग्रॉसमन यांनी पालघरजवळील एका आश्रमात योग प्रशिक्षक म्हणून प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील फिल्म सिटी येथे जाऊन लोकप्रिय मालिकेच्या अनुपमा च्या चित्रीकरण संचालाही भेट दिली. पुढे गुजरातमध्ये त्यांनी माणवेंद्रसिंह गोहिल आणि त्यांच्या पतीची भेट घेतली. “आज मी गोव्याला रवाना होत आहे. त्यानंतर म्हैसूर आणि केरळला जाण्याचा माझा विचार आहे. भारत अतिशय मोठा आणि सुंदर देश आहे. मी नक्कीच पुन्हा येथे येईन,” असे नाओमी ग्रॉसमन यांनी सांगितले.

