नागपूर ः महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरासाठी स्थगिती दिली. यावरून आता राज्याचे राजकारण तापले आहे.

सत्ताधारी शिवसेनेला (शिंदेगट) विचारात न घेताच हा निर्णय घेण्यात आल्याची टीका होत आहे. परंतु दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयाला स्थगिती दिल्याने मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल केला आहे. त्यांना मराठीबद्दल आपुलकी नसल्याची टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी प्रसंगी हिंदी भाषिक टॅक्सी चालकांना मारण्याची भाषा केली.

काय म्हणाले अमित ठाकरे

मराठी शिकणार ही त्यांची मग्रुरी आहे. मराठी आपली भाषा आहे. मुख्यमंत्री गुजरात, पंजाबला जावून आले. त्यांना आपल्या भाषेची आपुलकी नाही. त्यामुळेच त्यांनी मुदतवाढ दिली. हिंदी भाषिक लोकांना मराठी भाषा शिकायची नाही. मग्रुरी पणे बोलताहेत की आम्ही मराठी शिकणार नाही. त्यांनी मराठी आत्मसाद करायला पाहिजे. मराठी बोलायला पाहिजे. ते मराठी बालले नाही, वाईट शब्दात मराठी माणसाशी बोलसे तर मार खातील, असे अमित ठाकरे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले..

उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ

चार महिन्यांनी उत्तर प्रदेशाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लक्षात घेता या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आल्याची टीका ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, दहा- पंधरा वर्षांची मुदत द्या. तुमची मराठी भाषेबाबत किती आपुलकी आहे, ती कळली. कुठेतरी एक भूमिकेवर रहायला पाहिजे. परंतु त्यांचे लक्ष निवडणुकीकडे आहे. यूपीची सत्ता त्यांच्याकडून जात आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. मला ही मुदतवाढ नाही आवडली. किती वाक्ये शिकावी लागतात. डावीकडे जायचे, उजवीकडे जायचे, ओटीपी काय आहे. हे साधे वाक्य शिकायला एक वर्ष लागते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षात अंतर्गत वाद असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे कौतूक

पुणे येेथे झालेल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे अमित ठाकरे यांनी कौतूक केले. असे राहुल गांधी निवडणुकीत दिसले असते तर आम्ही त्यांच्या सोबत गेलो असतो. राहुल गांधींसोबत पुढे जाणार का ही पक्ष प्रमुख राजसाहेब ठरवतील, असे ते म्हणाले. पक्ष प्रमुखांनी सूचना केल्यास ५ तारखेला दिल्लीत जाणार असे म्हणाले.