अकोला : खरात प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने होत आहेच, मात्र अजित पवार यांच्या विषयावर सुद्धा गांभीर्याने लक्ष राहणे गरजेचे आहे. विमान अपघात प्रकरण हळूहळू मागे पडत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात विविध धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केले. अशोक खरात आणि VSR कंपनीचे संबंध असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाशी अशोक खरात याचा संबंध असू शकतो, असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.

आता मिटकरी यांनी खरात प्रकरणाची चौकशी योग्य असल्याचे सांगून अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणाची चौकशी देखील गांभीर्याने होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

विमान अपघाताची चर्चा ठरल्याप्रमाणे व्हावी

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “सरकारकडून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे. मात्र, त्याचवेळी अजितदादांच्या विषयावरही तितक्याच गांभीर्याने लक्ष राहणं गरजेचं आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचा विषय हा हळूहळू मागे पडतोय. सभागृहात निरोप समारंभावर वेळ नाही दिल्या गेला तरी चालेल पण अजितदादांच्या विमान अपघाताची चर्चा ठरल्याप्रमाणे कामकाजात व्हावी.”

…तरच सत्य परिस्थितीसमोर येईल

संबंधित भोंदू बाबाचे मागील किमान पाच महिन्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तत्काळ काढून त्याचा सखोल अभ्यास करण्यात यावा, तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्ती, हालचाली व संभाव्य नेटवर्क यांची तपासणी करण्यात यावी. यामुळे या संपूर्ण प्रकरणामागील सत्य परिस्थिती उघडकीस येण्यास मदत होईल व कोणताही घातपाताचा कट असल्यास तो वेळीच हाणून पाडता येईल. ही बाब सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर असल्याने स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

भोंदूबाबाचा तो कोण भक्त होता?

२७ जानेवारीला कारने पुण्याला जाणारे अजितदादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदूबाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला, हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल, असा दावा मिटकरी यांनी केला.