अकोला : बारामती विमानतळावर धुकं नव्हे तर धोका होता. अजितदादा पवार यांचा १०० टक्के घातपातच झाला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. अजितदादा सारखा देव माणूस हिरावून नेण्याचे पाप करणाऱ्यांची चिता जाळण्यासाठी देखील त्यांच्या घरात कोणी शिल्लक राहणार नाही, अशी उद्विग्न भावनाही मिटकरी यांनी व्यक्त केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी घातपाताचा दावा केला.
अमोल मिटकरी म्हणाले, “अजितदादा यांच्या विमान अपघातावेळी बारामती विमानतळावर धुके नव्हते तर धोका होता. त्यामुळे अजित दादांचा १०० टक्के घात झाल्याचे स्पष्ट होते. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत लढा देणार आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले. अजितदादानंतर त्यांच्या कुटुंबीयांसाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेणार आहे. यासंदर्भात ‘मे’ महिन्यात भूमिका जाहीर करू.”
माझा विश्वास आहे आणि माझ मन सांगते दादा असे जाऊच शकत नाहीत. ज्यांनी कुणी हा देव माणूस हिरावून नेण्याचे पाप केले असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल, अशी भावना देखील मिटकरी यांनी व्यक्त केली.
अनेक प्रश्नांमुळे संशयाचे धुके
प्रवासी यादी नोंदवलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल, फिटनेस, सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली? याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

