scorecardresearch

“अब्दुल सत्तारांमध्ये लाज, लज्जा, शरम या तिन्ही गोष्टी…”; गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून अमोल मिटकरींचं टीकास्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्र सोडलं.

“अब्दुल सत्तारांमध्ये लाज, लज्जा, शरम या तिन्ही गोष्टी…”; गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून अमोल मिटकरींचं टीकास्र
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

राज्याचे कृषीमंत्री आणि तत्कालीन सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी वाशीम शहराला लागून असलेली ३७ एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेतून उघड झाला होता. हा मुद्दा आज विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित केला. यावेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे बघायला मिळालं. दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्र सोडलं. अब्दुल सत्तारमध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “बॉम्ब बरेच, वातीही काढल्यात, आता…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा

काय म्हणाले अमोल मिटकरी?

अब्दुल सत्तार् यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही चहा घेता की दारू, अशी विचारणार केली होती. हे तेच अब्दुल सत्तार आहेत, ज्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली मंत्रीपदासाठी उद्दव ठाकरेंशी गद्दारी करून गुवाहाटीला गेले. हे तेच अब्दुल सत्तार आहेत, ज्यांनी सुप्रिया सुळेंविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती आणि आता याच अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड महोत्सवाच्या नावाखाली कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. इतकच नाही, तर त्यांनी गायरान जमीन वाटप करण्याचा अधिकार उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला नसतानाही आपल्या पदाचा गैरवापर करून वाशिममधली ३७ एक्कर जमीन अवैधरित्या वाटलेली आहे. त्यामुळे जर अब्दुल सत्तार यांच्यात लाज, लज्जा, शरम या तिन्ही गोष्टी शिल्लक असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Assembly Winter Session 2022 Live : “वसुली भाई, सत्तार भाई…”, विरोधकांची कृषीमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

विधानसभेत विरोधक आक्रमक

दरम्यान, या प्रकरणावरून आज विरोधकांनी विधानसभेतदेखील आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेत कामकाज सुरू असताना जेव्हा अब्दुल सत्तार यांचा विषय निघाला आणि जमिनीचं प्रकरण पुढे आलं, त्यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘भूखंड खा कुणी श्रीखंड खा!’, ‘गद्दार बोलो सत्तार बोलो’ अशा घोषणा देत विरोधकांनी रोष व्यक्त केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 15:44 IST

संबंधित बातम्या