अकोला: आमदार अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच अडचणीत आणले आहे. त्यांनी पक्षाच्या नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम केले. याचा गैरफायदा विरोधक घेत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी करून अमोल मिटकरी यांना गृहजिल्ह्यातूनच घरचा आहेर दिला. या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवर देखील अमोल मिटकरी यांनी असमाधान व्यक्त केले. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांच्यासोबत देखील अमोल मिटकरी दिसून आले. पक्षाविरोधात ते भूमिका घेत आहेत का? अशी कुजबूत राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरू झाली. दरम्यान, या सर्व मुद्द्यावरून प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अमोल मिटकरी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मदन भरगड म्हणाले, ‘विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीची मागणी अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन योग्य व्यासपीठावर करणे आवश्यक होते. मात्र, अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केवळ अमोल मिटकरीच करीत आहे, पक्ष किंवा पक्षाचे नेते तशी मागणी करीत नाहीत, असे चित्र मिटकरींच्या भूमिकेमुळे तयार झाले. त्यामुळे गैरसमज पसरला. पक्षाचे नेतेच समाज माध्यमांवर नागरिकांकडून दोषी ठरवले जात आहेत. विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले. पक्षाच्या नेत्यांनाच ट्रोलिंग केले. पक्षाला अमोल मिटकरींनी अडचणीत आणले.’

‘श्रेय घेण्यासाठी मिटकरींची घाई?’

अमोल मिटकरींनी ऐवढी घाई कशासाठी केली. कदाचित त्यांचे अजितदादांवर अधिक प्रेम असावे किंवा चौकशीचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी हे केले असावे, अशी टीका सुद्धा मदन भरगड यांनी केली. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, जय पवार यांना ट्रोल केले जात आहे. पक्षाच्या नेत्यांविषयी काही जण जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती पसरवत आहेत. त्याला कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती आणि तथ्यांच्या आधारे ठामपणे उत्तर द्यावे, असे आवाहन भरगड यांनी केले.