अकोला : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावर विविध प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शांत राहणं नैतिकतेला शोभेल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शंका जेवढ्या वाढतात, तितकी वेदना वाढते. ‘हम पागल ही अच्छे है’, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विमान अपघातावर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आमदार रोहीत पवार यांनी देखील घातपाताची शक्यता वर्तवली. हे प्रकरण आमदार अमोल मिटकरी यांनी सातत्याने लावून धरले. आता त्यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट टाकत विमान अपघात प्रकरणावर भाष्य केले.

अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘काही जण म्हणताहेत, दे सोडून हा विषय. मला प्रश्न इतकाच पडतोय, ज्यांनी या पुरोगामी महाराष्ट्रासाठी व शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचारधारेसाठी आयुष्यभर लढा दिला, ज्या नेत्याने कधी जातीवर मत मागितली नाहीत, त्यांच्या जाण्याबाबत शांत राहण नैतिकतेला शोभेल का? सत्य काहीही असो, ते स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने समोर आले पाहिजे. कारण शंका जेवढ्या वाढतात, तितकी वेदना वाढते. हम पागल ही अच्छे है.’’

आमदार अमोल मिटकरी यांच्या भूमिकेनंतर पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटले असून विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अमोल मिटकरींचे प्रश्न नेमके कोणते?

अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली?

तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली? याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.