अकोला : बारामती येथील विमान अपघाताची थातूर-मातूर चौकशी अहवाल येत आहेत. अजितदादा पवार इतकी सामान्य व्यक्ती नव्हते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुनावले आहे. महाराष्ट्र पुरावा मागतोय, असे देखील ते म्हणाले.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता पुन्हा एकदा मिटकरींनी समाज माध्यमांवर पोस्ट करीत अपघाताच्या चौकशीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘‘अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा थातूर-मातूर चौकशी अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे. अजितदादा इतके सामान्य व्यक्ती नव्हते. अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला, तर जनता मान्य करेल? महाराष्ट्र पुरावा मागतोय! विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून अजितदादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा.’’
अंजली दमानिया यांच्या वक्तव्याचा समाचार; असंवेदनशीलतेचा निषेध
अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहेत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना जाणीवपूर्वक संशय निर्माण करणे हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित प्रयत्न आहे.
या कठीण आणि भावनिक काळात शब्दांचा विपर्यास करून वातावरण दूषित करण्याऐवजी, दुःखात सहभागी होणे अपेक्षित होते. तथ्यांशिवाय आरोप करणे हे ना माणुसकीला शोभते, ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला. अंजली दमानिया यांच्या असंवेदनशीलतेचा निषेध व धिक्कार असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
अनेक प्रश्नांमुळे संशयकल्लोळ
प्रवासी यादी नोंदवलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

