अकोला : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीत कलह सुरू झाला. पक्षातील नेते, लोकप्रतिनिधीच आपसात भिडत असून टीका-टिप्पणी करीत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना खडेबोल सुनावले आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत ‘विचार केला जाईल’ असे वक्तव्य केल्यावरून अमोल मिटकरी यांनी चाकणकरांचा समाचार घेतला. विचार करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्न आमदार मिटकरींनी उपस्थित करीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावरून नेत्यांनी मते-मत्तांतरे समोर येत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयावर भाष्य करून रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही त्या जागेवर विचार होऊ शकत नाही. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचेही हेच मत आहे. त्यामुळे प्रस्ताव आला तर विचार करू, अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनांना धक्का देणारे आहे. सुनेत्रा वहिनी याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, त्या अध्यक्ष झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करू. या मुद्द्यावर विचार करू अशा पद्धतीने बोलणाऱ्यांना आमचे समर्थन नसेल.’’

निर्णय प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न? कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाईल का?

आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही देखील पक्षाचे कार्यकर्ते आहोत. निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार आहे का? की फक्त वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतले जाणार आहेत? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

पक्ष म्हणजे केवळ नेते नव्हेत, तर त्यामागे उभा असलेला कार्यकर्ता हा खरा कणा आहे. अजितदादांसाठी जो कार्यकर्ता रडला, ज्याने जीवापाड प्रेम केले, अजितदादा गेल्यानंतर आजही ज्याच्या घरात सुतक आहे, असे कार्यकर्तेही महत्त्वाचे आहेत, अशा शब्दात अमोल मिटकरींनी भावना व्यक्त केल्या.