अकोला : राजकारणात केव्हा काय घडेल आणि कोण कोणाचा समर्थक किंवा विरोधक होईल, हे सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाया पडल्याचा प्रकार आज समोर आला. याची चित्रफित समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली. अमोल मिटकरी एकदम सुप्रिया सुळे यांच्या पाया पडण्यामागचे नेमकं कारण काय? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
विधिमंडळ परिसरात नेत्यांची वर्दळ
मुंबईला राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यातच राज्यसभा निवडणूक प्रक्रियेची लगबग देखील सुरू झाली. या निमित्ताने मोठ्या नेत्यांनी विधिमंडळ परिसरात वर्दळ वाढली. दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ अनेक नेते, आमदार उपस्थित होते. यामध्ये आमदार अमोल मिटकरी यांचा देखील समावेश होता. सुप्रिया सुळे परिसरात दाखल होताच अमोल मिटकरी यांनी हात जोडून त्यांचे स्वागत करीत चक्क त्यांच्या पायाच पडले. या प्रकाराची दोन्ही राष्ट्रवादी पक्षांसह राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली.
विमान अपघातावरून अनेक शंका-कुशंका
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवर देखील अमोल मिटकरी यांनी असमाधान व्यक्त केले. या प्रकरणी मिटकरी यांनी आणखी काही दावे केले आहेत.
अजितदादा पवार यांच्या विमानातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याचीही माहिती समोर येत आहे. सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याची माहिती आहे. सुमित कपूर जर जिवंत असतील तर याचा अर्थ DGCA ने आधी ६ माणसे विमानात होती सांगितले, त्यानंतर ५ जणांचा मृतदेह सापडला, असं सांगितले. याचा अर्थ त्या विमानात सुमित कपूर नव्हते. शांभवी पाठक विमान चालवत होती का? असेही प्रश्न मिटकरींनी उपस्थित केले आहेत.
रोहित पवारांशी जवळीक का?
अपघाताची चौकशी करावी, यात चुकीचे काय? रोहित पवार अपघाताबाबत जे बोलत आहेत, त्याच्या बाजूने मी आहे. इतर राजकीय गोष्टींवर मी त्यांचे समर्थन करत नाही, असेही अमोल मिटकरींनी सांगितले.
