अमरावती: देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि विदर्भाच्या विकासामध्ये भर घालणारा अमरावती येथील ‘एअर इंडिया फ्लाईंग ॲकेडमी’चा (FTO) प्रकल्प’ आता प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. बेलोरा विमानतळावर उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी केंद्राचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, प्रशिक्षणासाठी लागणारी सर्व ३४ विमाने विमानतळावर दाखल झाली आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) आणि टाटा समूहाची मालकी असलेल्या ‘एअर इंडिया’ यांच्या संयुक्त सहकार्याने साकारत असलेला हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा वैमानिक प्रशिक्षण प्रकल्प ठरणार आहे.

लवकरच सुरू होणार प्रशिक्षण

या केंद्राच्या उभारणीमुळे देशभरातील भावी वैमानिकांना महाराष्ट्रातच जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महिनाभरात या ॲकेडमीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू करण्याचे नियोजन असून पहिल्या तुकडीत १८० प्रशिक्षणार्थींचा समावेश असले, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, तारखेची औपचारिक घोषणा प्रशासकीय व परिचालन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच केली जाईल.

विमानांचा ताफा दाखल

संपूर्ण प्रशिक्षण ताफा बेलोरा विमानतळावर दाखल झाला असून त्यात ३१ सिंगल-इंजिन ‘पायपर आर्चर’ आणि ३ ट्विन इंजिन ‘डायमंड DA12 NG’ अशा एकूण ३४ अत्याधुनिक विमानांचा समावेश आहे. ही सर्व विमाने ‘गार्मिन G1000 NXi कॉकपिट सिस्टिम’ आणि ‘ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्व्हिलन्स-ब्रॉडकास्ट’ (ADS-B) या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

१० एकरांवर सर्वसुविधायुक्त संकुल

प्रशिक्षण केंद्राचा संपूर्ण परिसर १० एकरांवर विस्तारलेला असून येथे वसतिगृह, भोजन कक्ष, अत्याधुनिक वर्गखोल्या, ब्रीफिंग रुम, हँगर आणि विमानांच्या देखभालीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्यक्ष विमानावर जाण्यापूर्वी सरावासाठी तीन फ्लाईट सिम्यूलेटर (दोन सिंगल इंजिन व एक मल्टी इंजिन) उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक उड्डाण प्रशिक्षकामागे केवळ सहा प्रशिक्षणार्थी अशी रचना ठेवून वैयक्तिक गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे.

१८ महिन्यांचा अभ्यासक्रम

कमर्शियल पायलट लायसन्ससाठी (CPL) हा अभ्यासक्रम १८ महिन्यांचा असणार आहे. या दरम्यान, प्रत्येक प्रशिक्षणार्थीला २०० तासांचे प्रत्यक्ष उड्डाण पूर्ण करावे लागेल. यात सिंगल-इंजिन विमानावर १८५ तास आणि मल्टी-इंजिन विमानावर १५ तासांच्या उड्डाणाचा समावेश असेल. अमरावतीमधील अनुकूल हवामानामुळे वर्षातील किमान ३०० दिवस उड्डाणासाठी पोषक वातावरण उपलब्ध राहू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.