अमरावती: विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती शहरात प्रवासी विमानसेवा प्रारंभ झाली, त्याची आज वर्षपूर्ती होत आहे. गेल्या वर्षी १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे लोकार्पण झाले होते. गेल्या वर्षभरात येथील विमानतळावरून सुमारे १४ हजार प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला आहे. येथून ७२ आसनी विमानाचे उड्डाण होते. अलायन्स एअरच्या विमान कंपनी ही विमानसेवा पुरवत आहे.

विमानसेवेचा विस्तार

सुरूवातीला आठवड्यातून केवळ तीन दिवस चालणारी विमानसेवा आता पाच दिवसांपर्यंत विस्तारली आहे. विमानतळावरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला. येथील विमानतळावरून वर्षभरात नियोजित आणि अनियोजित अशा ४५० हून अधिक विमान फेऱ्या झाल्या असून यात १४ हजारांहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. सुरूवातीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

‘नाईट लँडिंग’चे वेध

विमानतळाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) आता रात्रकालीन विमान उड्डाणाच्या सुविधेवर (नाईट लँडिंग) लक्ष केंद्रित केले आहे. धावपट्टी आणि ॲप्रोच लायटिंगचे काम अंतिम टप्प्यात असून जुलै २०२६ पर्यंत ही सुविधा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यामुळे विमान कंपन्यांना रात्रीच्या वेळीही उड्डाणे निश्चित करणे सोपे होणार असून कामकाजाचे तासही वाढणार आहेत, अशी माहिती ‘एमएडीसी’च्या सूत्रांनी दिली.

तांत्रिक सक्षमीकरण

सुरक्षित विमान प्रवासासाठी आवश्यक असलेल्या ‘डॉप्लर व्हीएचएफ ओम्नी रेंज’ सर्वेक्षणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामुळे विमानांना अचूक दिशानिर्देश मिळण्यास मदत होणार असून खराब हवामानातही विमान उतरवणे सुलभ होईल. ‘एमएडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे यांच्या नेतृत्वात सर्व चमू विमानतळाच्या विकास प्रकियेत सहभागी असून अमरावती विमानतळ हे विदर्भाच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारून जास्तीत जास्त ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यास आमचे प्राधान्य आहे, असे ‘एमएडीसी’ कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आठवड्यातून पाच दिवस सेवा

अलायन्स एअर कंपनी विमानसेवा पुरवित असून दर रविवारी, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील पाच दिवस ही विमानसेवा सुरू आहे. या दिवसांमध्ये मुंबईहून सकाळी ७.०५ वाजता अमरावतीकडे विमान झेपावते, ते सकाळी ८.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहचते. त्यानंतर येथून सकाळी ९.१५ वाजता हेच विमान मुंबईसाठी उड्डाण घेते आणि सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर पोहचते.