अमरावती: अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण कार अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलोरा विमानतळाजवळ हा अपघात घडला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले चारही युवक हे बडनेरा येथील जुनीवस्ती परिसरात राहत होते. या घटनेमुळे बडनेरा शहरात शोकमय वातावरण आहे.

अपघात कसा घडला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बडनेरा जुनी वस्ती परिसरात राहणारे सात युवक मध्यरात्री बेलोरा विमानतळाजवळच्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. चहा घेऊन रात्री दीड वाजताच्या सुमारास बडनेराकडे परत येत असताना त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला एका झाडावर आदळली. हा आघात एवढा प्रचंड होता, की कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला.

सर्व जण बडनेरा येथे राहणारे

मोहम्मद अनस मोहम्मदद सईद (वय २०, रा. बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय २२, बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (वय २६, बडनेरा जुनी वस्ती), आणि अब्दूल अनवेस अब्दूल सलीम (वय २२, बडनेरा जुनी वस्ती), अशी मृतांची नावे आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार

या अपघातात तीन तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी बडनेरा मार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच परिसरातील चार युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने बडनेरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपघाताची नोंद केली आहे.

Amravati Akola Highway Accident leads to the tragic death of four youth from Badnera late Monday night (photo- loksatta)
अपघातग्रस्त गाडी

पोलीस तपास सुरू

कार अनियंत्रित होऊन झाडावर कशी आदळली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी सीसीटीव्ही चित्रिकरण शोधण्यात येत आहे. घटनेच्या वेळी त्या ठिकाणी ट्रक होता का, याचाही शोध घेतल्या जात आहे.

पाचवा मोठा अपघात

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यातील हा पाचवा मोठा अपघात आहे. मेळघाटात फेब्रुवारी मध्ये राणीगाव घाट येथे पीक अप वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. तर मार्चमध्ये धारणी ते परतवाडा मार्गावर पीक अप वाहन पुलाखाली कोसळून २ महिला मजुरांचा मृत्यू झाला होता. वरूड ते राजुरा मार्गावर भरधाव बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता.