अमरावती: शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी’. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश.

सुमारे दोनशे वर्षांची परंपरा

अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर होलिकादहनाची वेगळी पंरपरा आहे. महिनाभर आधीच माघ पौर्णिमेला होळी उभारली जाते. या होळीत महिनाभर नवसाचे नारळ रचले जातात आणि ओटी भरली जाते. या होळीला सुमारे २०० हून अधिक वर्षांची परंपरा आहे.

नवसाची म्हणून ही होळी प्रसिद्ध आहे. अंबामातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक या होळीला मोठ्या भक्तिभावाने नारळाची ओटी बांधतात. दरवर्षी शहरातील भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनाला येतात. दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला मंदिरासमोर हेट्याचे (हादगा) झाड गाडले जाते. त्यानंतर मंदिराद्वारे प्रथम तेथे रंगीत कापडात नारळ बांधले जाते. त्यानंतर भाविक या झाडाच्या फांद्यांना रंगीत कापडात गुंडाळून नारळ बांधत असतात. ही प्रक्रिया फाल्गुन पौर्णिमेपर्यंत सुरू असते. या कालावधीत मोठ्या झाडाला हजारावर नारळ बांधले जातात. त्यानंतर या सर्व नारळांचे होळी पौर्णिमेला परंपरेनुसार दहन केले जाते.

नारळ वाहण्याचीही परंपरा

आपल्यावरील संकट दूर व्हावे, दुर्गुणांचा नाश व्हावा, अशी प्रार्थना करीत भाविक या झाडाला नारळाची ओटी बांधतात आणि श्री अंबामातेची पूजा करतात. त्याचबरोबर गाठी, शेणाच्या गोवऱ्या सुद्धा अर्पण करतात. सतत माघ पौर्णिमेपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत १ महिना हा क्रम सुरू असतो. दरवर्षी होळीचे विधीवत पूजन करून होळी पेटवली जाते. होलिका दहनानंतर अंबामातेला नैवेद्य दाखवण्यात येतो.

दर्शनाला हजारो भाविक मंदिरात येत असतात. काही जळत्या होळीला नारळ अर्पण करतात. त्यामुळे ही नारळाची होळी शहरातील मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. हादग्याच्या झाडाला नारळ, खारीक, बदाम, तांदळाची ओटी बांधली जाते. या सर्वच पदार्थांचे दहन होत नसल्याने त्यातून जी राख उरते तीही गुणकारी असल्यामुळे होळीचे दहन झाल्यानंतर ज्यावेळी ती थंड होते. त्यावेळी ही राख विभूती म्हणून कपाळाला लावली जाते, अशी माहितीही देण्यात आली.