अमरावती : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील महिला आणि युवतींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गाजत असतानाच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातही अशाच प्रकारचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. एका १९ वर्षीय युवकाने अनेक अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि त्यांचे व्हिडिओ, फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुमारे शंभरावर व्हिडिओ प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली असून न्यायालयाने त्याला येत्या २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे आणि एका तरूणाचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळालनी होती. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयान अहमद याने विविध मुलींशी ओळख वाढवून त्यांच्या इच्छेविरूद्ध अश्लील चित्रीकरण केले आणि ते फोटो-व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

आरोपीला अटक, मोबाईल जप्त

या प्रकरणात परतवाडा पोलिसांनी आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली. आज दुपारी आरोपी अयान अहमद याला अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने समाज माध्यमांवरील प्रसारित व्हिडिओ, फोटो हटविण्याचे काम सुरू केले आहे. ज्यांनी हे व्हिडिओ डाउनलोड केले, त्यांच्याकडून ते पुन्हा समाज माध्यमांवर प्रसारित होण्याचा धोका आहे. पोलीस अशा पोस्टवर नजर ठेवून आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.

पोलिसांचे आवाहन

बदनामीच्या भीतीपोटी अद्याप कोणतीही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना सहकार्याचे आवाहन केले आहे. पीडित मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्यांना समुपदेशनासह सर्व कायदेशीर मदत दिली जाईल, तरी अशा प्रवृत्तींना शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.