अमरावती : परतवाडा येथे उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि समाज माध्यमांवर आक्षेपार्ह चित्रफिती प्रसारित करण्याच्या प्रकरणात आता अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. यातील मुख्य आरोपी अयान अहमद याने दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची माहिती उघड झाली आहे. त्याने अमरावती शहरातील एका मित्राची खोली काही तासांसाठी भाड्याने घेऊन तिथे या मुलींवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. येथील कठोरा मार्गावरील एका निवासी संकुलातील सदनिकेत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या सदनिकेला सध्या कुलूप आहे. या सदनिकेचा मालकही आता चौकशीच्या फेऱ्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांचे म्हणणे काय?
कठोरा मार्गावरील या सदनिकेत अनेक मुली आणि तरूण दुपारी, रात्री येत होते. संकुलात राहणाऱ्या काही लोकांनी सदनिका मालकाला याविषयी माहिती दिली, पण त्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले, असे या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अशा गोष्टी लपून राहत नाहीत, वेळ आल्यावर उघड होतच असतात, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आरोपी अयान अहमद याने पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यान या सदनिकेची माहिती दिली. हे घटनास्थळ ठरू शकते. यासाठी अमरावती शहर पोलिसांची मदत घेतली जात आहे. ज्या मित्राकडून अयानने भाड्याने खोली घेतली, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत.
प्रकरणाची व्याप्ती वाढणार
या गुन्ह्यात आणखी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आक्षेपार्ह चित्रफिती आरोपी उजेर याने टेलिग्रामवरून एका व्यक्तीला पाठवल्या. त्याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींचे पाच मोबाईल आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त आणखी ४ जणांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
पोलिसांचे आवाहन
पीडित मुलींनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी कोणत्याही भीतीशिवाय तक्रार नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. मदतीसाठी महिला पोलीस अधिकारी किंवा सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधता येईल. तसेच, समाज माध्यमांवर पीडितांची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य प्रसारित करू नये, असा इशाराही अमरावती ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.
