अमरावती : बडनेरामध्ये एका लग्नसमारंभात चक्क नवरदेवावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बडनेरा मार्गावरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे विवाहाचा स्वागत समारंभ सुरू असताना एका युवकाने नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.
नंतर बाहेर दुचाकीवर बसून असलेल्या सहकाऱ्याच्या मदतीने तो तेथून पळून गेला. या थरारक घटनेचा ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने काढण्यात आलेला व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत झाला आहे.
या हल्ल्यात नवरदेव सुजल हा जखमी झाला असून नववधू आणि नवरदेवाची आई दोघेही चक्कर येऊन घटनास्थळीच पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने लग्नाच्या स्वागत समारंभात आणि बाहेरुन आलेल्या पाहुण्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर आरोपी हा नवरदेव सुजल याचाच मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नाच्या स्वागत समारंभादरम्यान नवरदेव सुजल समुद्रे याचा मित्र आरोपी राजू बक्षी हा स्वागत समारंभात पोहचला आणि अचानकपणे त्याने सुजलच्या पायावर आणि कमरेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात सुजल हा जखमी झाला असून त्याच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीबरोबर एक विधीसंघर्षित बालक साथीदार होता. तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला होता. हल्ला केल्यानंतर दोघेही जण पळून गेले.
या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याने पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर स्वागत समांरभात उपस्थित असलेल्या जखमी सुजलच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपी राजू बक्षी याचे घर गाठले आणि एका गाडीची तोडफोड केली, तर एक गाडी जाळून टाकली. घरातही नासधूस करण्यात आली. या प्रकरणी आरोपी नातेवाईकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
ही हल्ल्याची घटना घडली, तेव्हा स्वागत समारंभाचे ड्रोनच्या सहाय्याने व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येत होते. हल्ला केल्यानंतर आरोपी हा पळून जात असताना प्रसंगावधान राखून त्याचे चित्रिकरण ड्रोन संचालित करणाऱ्या छायाचित्रकाराने लगेच केले. या व्हिडीओमध्ये आरोपी हा हल्ला केल्यानंतर मोटरसायकलवर पळून जाताना दिसत आहे. आरोपीचा पाठलाग करीत सुजलचा एक नातेवाईक हा मोटरसायकलपर्यंत पोहचला होता, पण आरोपी त्याच्या हातून निसटला.
