नागपूर : अमरावती येथील बेलोरा विमानतळ परिसरात मंगळवारी रात्री तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळल्याने काही काळ खळबळ उडाली. विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी वेळीच सतर्कता दाखवत सर्पमित्रांना पाचारण केल्याने संभाव्य अनर्थ टळला. अजगराला सुरक्षितरीत्या पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिसला मोठा अजगर
रात्रीच्या वेळी विमानतळ परिसरात गस्त घालत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोठा अजगर दिसला. त्यांनी कोणताही धोका न पत्करता तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्रांनी काळजीपूर्वक आणि कौशल्याने अजगराला पकडून सुरक्षितपणे ताब्यात घेतले. इतक्या मोठ्या आकाराचा अजगर पाहण्यासाठी परिसरात नागरिकांसह सुरक्षा कर्मचाऱ्यांची गर्दी झाली. अनेकांनी या दुर्मीळ प्रसंगाचे छायाचित्रण आणि सेल्फी काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सर्पमित्रांनी नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. रेस्क्यूनंतर अजगराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यानंतर त्याला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
वॉर संस्थेचे आवाहन
वॉर संस्थेच्या मते, पावसाळ्यात अधिवासात पाणी साचणे, भक्ष्याच्या शोधात किंवा नैसर्गिक हालचालींमुळे अजगरांसह इतर सर्प मानवी वस्ती किंवा मोकळ्या परिसरात दिसून येतात. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता किंवा सर्पाला इजा न करता तातडीने वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
पावसाळ्यात साप, अजगर, नाग मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, अशावेळी त्यांना स्वत:हून पकडण्याचा प्रयत्न करु नये. यातील अनेक साप हे विषारी देखील असतात. अशावेळी त्याने चावा घेतला आणि तातडीने उपचार मिळाला नाही तर जीव जाण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे हे धाडस कुणी करु नये, असे आवाहनही संस्थेने केले.
वर्षभरापूर्वीच सुरू झाली विमानसेवा
अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळावर अवघ्या वर्षभरापूर्वी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाली. १६ एप्रिल २०२५ ला या व्यावसायिक विमानसेवेचे उद्घाटन झाले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या विमानतळामुळे विदर्भातील हवाई संपर्काला चालना मिळाली असून, हा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. विमानतळ परिसरात एअर इंडियाचे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) उभारण्याचे कामही सुरू असून, त्यामुळे या परिसराचे महत्त्व आणखी वाढले आहे.
