अमरावती : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) सलग दोन दिवस विमानतळावरील ‘डीव्हीओआर’ आणि ‘एचपी-डीएमई’ या प्रगत दिशादर्शक यंत्रणांचे तांत्रिक परीक्षण (फ्लाईट कॅलिब्रेशन) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यामुळे अमरावती विमानतळावर लवकरच रात्रीच्या वेळी विमान उतरवणे (नाईट लँडिंग) शक्य होणार असून, प्रादेशिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.

विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी आणि अचूकतेसाठी ‘डीव्ही ओआर’ आणि ‘एचपी-डीएमई’ या प्रणाली कणा मानल्या जातात. ‘डीव्हीओआर’ ही एक अत्याधुनिक रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे. वैमानिकाला विमानाची दिशा आणि अचूक मार्ग निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होतो. डॉप्लर तंत्रज्ञानामुळे डोंगराळ किंवा अडथळ्यांच्या भागातही ही यंत्रणा अधिक अचूक रेडियल माहिती पुरवते. विमानाचे रनवेपासूनचे नेमके अंतर मोजण्यासाठी ‘एचपी-डीएमई’ या यंत्रणेचा वापर होतो. ही प्रणाली वैमानिकाला लँडिंगच्या वेळी अत्यंत अचूकता प्रदान करते.

परिचालन क्षमतेत वाढ

अमरावती विमानतळावरील या तांत्रिक यशामुळे विमानतळाची परिचालन क्षमता वाढली आहे. ‘नाईट लँडिंग’ची सुविधा सुरू होण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे, असे एमएडीसी प्रशासनाचे म्हणणे आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ‘फ्लाईट इन्स्पेक्शन युनिट’ने या प्रणालींची चाचणी घेतली. तपासणीनंतर या दोन्ही यंत्रणा आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या निकषांनुसार अचूक असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ‘आरसीएस’ श्रेणीतील विमानतळ असूनही अमरावतीमध्ये जागतिक दर्जाची ‘सीएनएस’ पायाभूत सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘एमएडीसी’च्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तांत्रिक देखरेखीखाली ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय साधून ही चाचणी विहित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला होता. या यशस्वी चाचणीबद्दल त्यांनी वैमानिक आणि तांत्रिक पथकाचे कौतुक केले आहे.

सध्या अमरावती विमानतळावरून अमरावती ते मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. या सेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांतच आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा सुरू होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता अमरावती विमानतळामध्ये मोठी व्यावसायिक क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता विमानतळाचा विस्तार आणि सुविधांच्या अद्ययावतीकरणावर भर दिला जात आहे.

सध्या अमरावतीकरांना दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद किंवा बेंगळुरू या शहरांत जाण्यासाठी रस्ते मार्गाने नागपूर विमानतळावर जावे लागते. मात्र अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुरू होताच या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.