अमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी येथील शेतशिवारात चारा कापण्यासाठी गेलेल्या आदिवासी मुलीवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरातील दहा गावे प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहे. बहुतांश गावकऱ्यांनी कालची रात्र जागून काढली. वन विभागाने या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.

सखोल चौकशीची मागणी

मुलीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांकडून सखोल चौकशीची मागणी केली जात होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अमरावती विभागाच्या उपवनसंरक्षकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. परतवाडा (मेळघाट प्रादेशिक) येथील सहाय्यक वनसंरक्षक अक्षय लांझे या समितीचे प्रमुख असतील. ही समिती घटनास्थळाची पाहणी करेल, कागदपत्रांची पडताळणी करेल, तसेच अधिकारी व स्थानिक नागरिकांची विचारपूस करेल. त्यानंतर, वस्तुस्थिती आणि विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल चार दिवसांच्या आत सादर केला जाईल.

वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्‍न

दरम्यान, वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यासाठी वनविभागाचे पथक सक्रिय झाले आहे. वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाने वाघिणीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन आणि प्रत्यक्ष क्षेत्रिय पाहणी सुरू केली आहे. तज्ज्ञ पशूवैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित पथकांच्या मदतीने वाघिणीचे ठिकाण निश्चित करून त्याला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधून वनविभागाची पुण्यावरून आणखी चमू अमरावतीमध्ये पाठवण्याची विनंती केली आहे.

दहा ते बारा गावांमध्ये खबरदारीचे आवाहन

सोनोरी, रिद्धपूर, ब्राह्मणवाडा, बहिरम, देऊरवाडा, मालूर पुनर्वसन आणि परिसरातील गावांमधील नागरिकांनी काही दिवस विशेष खबरदारी बाळगावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यात सध्याच्या परिस्थितीत शेतीच्या कामासाठी शेतात जाणे किंवा गुरे चरण्यासाठी जंगलालगतच्या भागात नेणे पूर्णपणे टाळावे. पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये. दाट झुडपे, नाले, नदीकाठ आणि जंगलालगतच्या परिसरात जाणे टाळावे. वाघ दिसल्यास आरडाओरड करू नये, त्याचा पाठलाग करू नये अथवा फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी जवळ जाऊ नये. वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधनाचे नुकसान झाल्यास शासनाच्या नियमानुसार भरपाई देण्यात येईल. तसेच अशी घटना घडल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी केले आहे.