scorecardresearch

अमरावती : शहर बससेवा बंद असल्‍याने प्रवाशांचे हाल; वाहतूकदार कंपनीचे कंत्राट रद्द

बंद पडलेली बससेवा येत्‍या आठ दिवसांत पूर्ववत होईल, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्‍यात आले  आहे.

अमरावती : शहर बससेवा बंद असल्‍याने प्रवाशांचे हाल; वाहतूकदार कंपनीचे कंत्राट रद्द

अमरावती : कराराचे उल्‍लंघन केल्‍याच्‍या कारणावरून शहर बससेवा वाहतूकदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्‍यात आल्‍याने शहर बस वाहतूक सेवा बंद पडली असून त्‍यामुळे सामान्‍य प्रवाशांचे हाल होत आहेत. अमरावती शहर बस वाहतुक सेवेचे कंत्राट पृथ्‍वी ट्रॅव्‍हल्‍स या कंपनीला काही वर्षांपुर्वी देण्‍यात आले होते. करारानुसार पृथ्‍वी ट्रॅव्‍हल्‍सला ४० बसगाड्या पुरविणे अनिवार्य होते. मात्र कंपनीने केवळ २५ बसगाड्यांमधून सेवा सुरू केली. या कंपनीला वारंवार सुचित करण्‍यात आले. दंड देखील आकारण्‍यात आला. पण, ४० बसगाड्या पुरविण्‍यात पृथ्‍वी ट्रॅव्‍हल्‍स असमर्थ ठरल्‍याने महापालिकेने बस सेवा करार रद्द केला. २४ तासांच्‍या आत सर्व २५ बसगाड्या, त्‍यांची कागदपत्रे तसेच थकबाकी आणि रॉयल्‍टीचे एकूण १ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा करावा, अशी नोटीस बजावण्‍यात आली. नोटीशीची मुदत संपताच महापालिकेने बसगाड्या जप्‍त करण्‍याची कारवाई सुरू केली. या बसगाड्या महापालिकेने ताब्‍यात घेतल्‍या पण, नवीन वाहतूकदार नेमण्‍यात न आल्‍याने शहर बससेवा बंद पडली. गेल्‍या पाच दिवसांपासून बससेवा बंद असल्‍याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेही वाचा >>> ई. डी. च्या छापेसत्राने नागपूरच्या व्यवसायिक क्षेत्रात खळबळ

बंद पडलेली बससेवा येत्‍या आठ दिवसांत पूर्ववत होईल, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्‍यात आले  आहे. बँकेचे थकित कर्ज नवीन कंत्राटदार फेडणार असून हा कंत्राटदार महापालिकेला रॉयल्‍टी देखील देईल, या अटीवर नवीन करार करण्‍यात येत असल्‍याचे प्रशासनाचे म्‍हणणे आहे.

जप्‍त करण्‍यात आलेल्‍या २५ पैकी १७ बसगाड्या या प्रशांत नगर येथील कार्यशाळेत, सात बसगाड्या नेमाणी गोदामाच्‍या पार्किंग स्‍थळी व एक बस दुरूस्‍तीसाठी पाठविण्‍यात आली आहे. शहर बससेवा पूर्ववत करण्‍यासाठी महापालिकेने मेघा ट्रॅव्‍हल्‍स या कंपनीसोबत नवीन करार केला असून येत्‍या आठ दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन बससेवा सुरू होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे. जुन्‍या कंत्राटदाराकडील थकित कर्जाचा भरणा नवीन कंत्राटदाराने करायचा आणि ५.२२ रुपये प्रतिकिलोमीटर या दराने महापालिकेला रॉयल्‍टी द्यावी, असा करार झाला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 12:43 IST