अमरावती: शहरातील वर्दळीच्या रविनगर चौकात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अज्ञात युवकाने चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी घडली. हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या या विद्यार्थिनीला ‘रीम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शर्वरी असे मृत तरूणीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार शर्वरी बीएससीच्या प्रथम वर्षाला शिकत होती. ती आपल्या दुचाकीने महाविद्यालयात जात असताना आरोपी युवक तिचा पाठलाग करीत होता. ती रविनगर चौकात पोहचल्यानंतर आरोपीने तिला गाठले आणि तिच्यावर चाकूने वार केले. भरदिवसा आणि गजबजलेल्या चौकात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

हत्येचे कारण अज्ञात

आरोपीने युवतीवर तब्बल आठ वेळा चाकूचे वार केले. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली. आरोपीने युवतीची हत्या का केली, हे अद्याप कळू शकलेले नाही. युवक हा गेल्या काही महिन्यांपासून शर्वरीचा पाठलाग करीत होता, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात संतप्त नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विकृत मनोवृत्तीच्या तरूणाने शर्वरीवर जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

आठ महिन्यांत ३२ हत्या

शहरात वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा नेहमीच चर्चिल्या जातो. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे देखील होतात. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत हत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत ३२ हत्यांच्या घटनांची नोंद झाली. मागील वर्षी याच कालावधीत हत्येच्या घटनांचे २६ एफआयआर नोंदविण्यात आले होते. रुक्मिनी नगरात भरदिवसा २५ वर्षीय तरूणाच्या हाताचा पंजा कापून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. हत्येच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.