अमरावती: शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रो. राम मेघे महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी भरदुपारी एका विद्यार्थिनीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. एका तरूणाने महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करून विद्यार्थिनीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी ‘रिम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपीचे नाव नवीन मेघराज वानवानी असे आहे. जखमी विद्यार्थिनी आणि आरोपी दोघेही डी. फार्म द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होते आणि त्यांची पूर्वीपासून ओळख असल्याचे समजते. प्राथमिक अंदाजानुसार एकतर्फी प्रेम आणि त्यानंतर झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सर्व बाजूंची पडताळणी सुरू केली असून, नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
घटनेनंतर काय घडले?
विद्यार्थिनीवर हल्ला झाल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांनी हल्लेखोर तरूणाला जागीच पकडून चोप दिला. यात आरोपीच्या हातालाही दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. हल्ल्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला असून प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांची जबानी नोंदवली जात आहे.
पोलीस चौकशी सुरू
पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थिनी आरोपीला ओळखत होती. नंतर दोघांमध्ये दुरावा आला होता, त्यामुळे आरोपी नैराश्यात होता. तसेच त्याने यापुर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही दावा केला जात आहे. मात्र, पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास आरंभला आहे. आरोपी विद्यार्थिनीचा पाठलाग करीत होता का, हे तपासले जात आहे. या घटनेने महाविद्यालयातील विद्यार्थी हादरून गेले आहेत.
रवीनगर चौकातील घटनेनंतर पुन्हा…
काही दिवसांपूर्वीच राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवी नगर चौकातही एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीच्या हत्येची थरारक घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता बडनेरा परिसरातील महाविद्यालयात विद्यार्थिनीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे महाविद्यालयीन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी बडनेरा पोलीस पुढील तपास करत आहेत.
