अमरावती : ‘एमडी’ (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या विक्रीसाठी शहरात येत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३ कोटी १ लाख २० हजार रुपये किमतीची २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील लालखडी-सुकळी मार्गावर करण्यात आली.

कारवाई कशी झाली?

अब्दुल फहीम अब्दुल रहीम (२५) रा. आझादनगर, अमरावती व शेख अयान शेख रमजान (२०) रा. द्वारकानगर, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन तरुण हे रविवारी सायंकाळी एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी लालखडी-सुकळी मार्गाने अमरावती शहरात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने लालखडी-सुकळी मार्गावर सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत काय आढळून आले?

चौकशीत त्यांनी आपली ओळख अब्दुल फहीम व शेख अयान अशी दिली. अंगझडतीत त्यांच्याजवळ २ किलो ८० ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आली. त्यांच्याकडून सुमारे ३ कोटी १ लाख २० हजार रुपये किमतीची एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

यापुर्वीही ‘एमडी’चा साठा जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात विविध ठिकाणी कारवाई करून अमली पदार्थांचे साठे जप्त केले आहेत. या पदार्थांची किंमत हजारो कोटी रुपये आहे. याच मालिकेत ‘डीआरआय’च्या पथकाने अमरावतीत गेल्या महिन्यात सुमारे पाच किलो एमडी जप्त केले होते. या अमली पदार्थांची किंमत सुमारे ७.५ कोटी रुपये इतकी आहे.

मोठे रॅकेट सक्रिय…

अहमदाबादच्या डीआरआय पथकाने अमरावतीत घुसून ७.५ कोटी रुपये किमतीचे ५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आणि चौघांना बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे, अटकेतील दोन आरोपी चक्क शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आता गुन्हे शाखेने नवीन कारवाई केली आहे. दोन महिन्यांपुर्वी वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात ‘डीआरआय’ने कारवाई करताना १२८ किलो एमडी जप्त केले होते. या कारवाईने अमरावतीत अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.