अमरावती : अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला देखील अटक केली. या दोघांनी आठ अल्पवयीन मुली व महिलांचे १८ व्हिडिओ व ३९ फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचे तपासात समोर आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रसार माध्यमांना दिली.
व्हिडिओ प्रसारित झाल्याने खळबळ
अयान अहमद तनवीर अहमद (१९) रा. परतवाडा व उजेर खान इकबाल खान (२०) रा. अचलपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात समाज माध्यमांवर काही अल्पवयीन मुली व महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. परतवाडा पोलिसांच्या तपासात हे व्हिडिओ आणि फोटो हे अयान अहमद याच्या मोबाइलवरून प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले.
पोलिसांच्याच तक्रारीवरून गुन्हा
पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून परतवाडा ठाण्यात अयान अहमद याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला सोमवार, १३ एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोबाइल जप्त करण्यात आला. त्यात काही अश्लील व्हिडिओ व फोटो आढळून आले. तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. चौकशीत अयान अहमद याने काही मुलींसोबत जवळीक साधून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढले. त्यानंतर ते समाज माध्यमांवर प्रसारित करून संबंधित मुलींची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने काय सांगितले?
सदर व्हिडिओ उजेर खान याने व्हायरल केल्याचे आरोपी अयान अहमदने पोलीस कोठडीच्या चौकशीत सांगितले. त्यानुसार पोलिसांनी उजेरलाही अटक केली. दरम्यान, सायबर पोलिसांकडून समाज माध्यमांवर प्रसारित झालेले संबंधित सर्व व्हिडिओ व फोटो वगळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी समाज माध्यमांवरील ज्या खात्यावरून ते प्रसारित करण्यात आले, तेसुद्धा बंद करण्यात आले आहे. या प्रकरणात पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांसोबत संपर्क करण्याचे आवाहन
या प्रकरणातील पीडिता व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनातर्फे प्रसारित करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांशी आपल्या सोयीनुसार संपर्क साधून माहिती द्यावी. सोबतच या प्रकरणाबाबत कुणाला काहीही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
