अमरावती: भारतीय समाजात जमीन आणि मालमत्तेचा वाद हा अनेकदा कुटुंबांतील वादाचे मूळ कारण ठरतो. वडिलोपार्जित जमीन, घरे, शेती, व्यावसायिक स्थळे किंवा अपारंपरिक मालमत्ता यावरून सख्ख्या भावांमध्ये, वडील-मुलांमध्ये किंवा भावकीत वाद निर्माण होतात. पैसा आणि जमिनीसाठी कधीकधी सख्खे भाऊ देखील एकमेकांचे वैरी होतात.
अमरावती शहरात अशीच एक धक्कादायक घटना घडली असून शेतजमिनीच्या कारणावरून सख्खे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले. शेतजमिनीच्या वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
या रक्तरंजित संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी गेलेला तिसरा भाऊदेखील गंभीर जखमी झाला असून, परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात आरोपीला साथ देणारे अन्य दोन आरोपी पसार झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नाजीम मोहम्मद लुकमान (५४, रा. पूर्णानगर), मृत मोहम्मद मकसूद मोहम्मद लुकमान (५७, रा. नूर नगर) आणि आरोपी अब्दूल तसकीन मोहम्मद लुकमान (६०, रा. छायानगर) हे तिघे सख्खे भाऊ. गेल्या काही काळापासून या तिघांमध्ये शेतजमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रुपांतर काही वेळातच हाणामारीत झाले.
यावेळी संतप्त झालेल्या ६० वर्षीय अब्दूल तसकीनने धाकटा भाऊ मकसूद याच्या छातीवर धारदार चाकूने वर्मी वार केला. हा हल्ला इतका भीषण होता की, मकसूद हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या नाजीम यांच्या कपाळावरही आरोपी भावाने वार केल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी अब्दूल तसकीन याला तातडीने अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्यात त्याला साथ देणारे नाहिद काझी उर्फ रेहमान डेंटर आणि सलेकिन अब्दूल सलीम काझी हे दोघेही पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तीनही आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
