अमरावती : ‘मुलीचे सौंदर्य आणि तिचे केस पाहून मुले तिच्याकडे आकर्षित होतात’ या अजब आणि मागास समजुतीतून जन्मदात्या आई वडिलांनीच आपल्या १६ वर्षीय मुलीचे संपूर्ण केस कापून तिला घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.
या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आई-वडिलांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नेमके काय घडले?
तारुण्यात आलेल्या आपल्या मुलीवर कोणीही वाकडी नजर टाकू नये, यासाठी आई, वडीलांनीच चक्क सोळा वर्षीय मुलीचे टक्कल केले. तिला मारहाणसुद्धा केली. या प्रकाराने मुलगी चांगलीच घाबरली व तिने थेट पोलीस ठाणे गाठून आई, वडीलांविरुद्ध तक्रार दिली. पिडीत मुलगी तीची आई व वडिलांसोबत राहते, ती सध्या शिक्षण घेत आहे. आपल्या मुलींवर कोणीही वाईट नजर टाकू नये, तिच्याकडे पाहू नये, यासाठी आईने व वडीलांनी काळजीपोटी ही धक्कादायक शक्कल लढवली. त्यांनी सोळा वर्षाच्या मुलीचे डोक्याचे केस घरातच ट्रिमर मशिनने कापून टाकले.
मुलींच्या निरीक्षणगृहात रवानगी
या प्रकाराने मुलगी घाबरली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर तिला पोलिसांनी बाल कल्याण समितीसमोर हजर केले. तिने समितीसमोर कैफियत मांडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकारानंतर आपल्याला छळ करणाऱ्या आई वडीलांसोबत आता रहायचे नाही, असे पिडीतेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे वरुड पोलिसांनी पीडितेला एका शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात पाठवले आहे.
तरूणाविरोधात तक्रार देण्यास सांगितले
एका तरूणाची तिच्यावर वाईट नजर असून तो तिचा पाठलाग करीत असल्याचा संशय तिच्या पालकांना होता. या अनुषंगाने संबंधित तरूणाविरूद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी पालकांनी पीडित मुलीवर दबाव टाकला होता. मात्र, मुलीने तक्रार देण्यास नकार दिला. याचा रागातून पालकांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे.
ज्या तरूणावरून पालकांनी इतके टोकाचे पाऊल उचलले, तो तरूण नेमका कोण, याचा शोध घेण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे. पालकांनी काळजीपोटी हा प्रकार केला असला, तरी त्यातून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील अधोरेखित झाला आहे. जिल्ह्यात मुलींच्या शोषणाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
