अमरावती: येथील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरूणाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि सोन्याचे लॉकेट लुटण्यात आले. मात्र तरूणाने आपण माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे कामाला असल्याचे सांगताच लुटारूंनी भीतीपोटी मोबाईल आणि लॉकेट घटनास्थळीच टाकून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेमकी घटना काय?

अमरावतीच्या विश्रामगृह चौक परिसरात एका युवकाला चाकूचा धाक दाखवून मोबाइल आणि सोन्याचे लॉकेट हिसकावून घेण्याचा खळबळजनक प्रकार घडला. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहा संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. फिर्यादी तरूण हा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी कामाला आहे.  रात्री तोंडाला कापड बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्याची मोटारसायकल अडवली आणि चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली.

सोन्याचे लॉकेट हस्तगत केले

फिर्यादीकडे पैसे नसल्यामुळे आरोपींनी त्याच्या खिशातील मोबाइल आणि गळ्यातील सोन्याचे लॉकेट बळकावले, तसेच त्याला मारहाण करून त्याची दुचाकीही पळवून नेण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर इतर काही युवक मोटारसायकलींवर  थांबून होते.

युवकाने ओळख सांगितली

ज्यावेळी सोन्याचे लॉकेट हिसकावण्यात आले, तेव्हा फिर्यादी तरूणाने आपण माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे कामाला असल्याची ओळख सांगितली. आरोपींनी भीतीपोटी मोबाइल, लॉकेट व मोटारसायकल घटनास्थळी टाकून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

असा घडला घटनाक्रम

रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी तरुण दूध घेऊन दुचाकीवरून परतत होता. विश्राम भवनासमोर दुचाकींवरून आलेल्या तरुणांनी त्याला अडवले. धाक दाखवत त्याच्याकडील मोबाईल आणि सोन्याचे लॉकेट घेतल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांत शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. शहरात गेल्या आठ महिन्यांत ३४ जणांची हत्या झाली आहे. पोलिसांकडून गस्त वाढवल्याचे सांगितले जात असले, तरी गुन्हेगारी कारवाया कमी झालेल्या नाहीत. या घटनेत दोन लुटारूंसोबत आणखी चार जण होते, अशी माहिती आहे. पोलिसांनी त्यांचाही शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील संशयितांचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.