अमरावती: भरधाव वेगात एका कारमधून आलेले दरोडेखोर सराफा दुकानासमोर थांबतात. रात्रीची वेळ. चौघांनीही चेहऱ्यावर कापड बांधलेले. सराफा व्यावसायिकाचा मुलगा एकटाच दुकानात. काही कळण्याच्या आत ते दुकानाचे शटर ओढून घेतात. त्याने आरडाओरड करताच, एक जण बंदूक दाखवून तर दुसरा चाकू अंगावर उगारून त्याला गप्प करतात. अवघ्या पाचच मिनिटात सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करून पोबारा करतात. चित्रपट शैलीतील दरोड्याचा हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री दर्यापूर या तालुका मुख्यालय शहरात घडला. सीसीटीव्ही कॅमेरात हा प्रकार चित्रित झाला आहे.

नेमके काय घडले?

दर्यापूर शहरात शिक्षक कॉलनी परिसरात गजानन माहोरे यांचे सराफा दुकान आहे. दुकानाच्या मागेच त्यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा गोविंद माहोरे हा दुकानाच एकटाच होता. नेमके त्यावेळी तोंडावर कापड बांधलेले चार दरोडेखोर दुकानात शिरले. त्यांनी लगेच आतून शटर ओढून दुकान बंद केले. गोविंद याने आरडाओरड करताच, एकाने बंदूक काढली आणि दुसऱ्याने चाकू उगारून त्याला गप्प राहण्यास सांगितले. त्याला एका कोपऱ्यात बसवून ठेवले. त्यावेळी दोघांनी त्याचे हात पकडून ठेवले. इतर दोन दरोडेखोरांनी अवघ्या पाचच मिनिटांत दुकानातील सर्व सोन्याचे आणि चांदीचे दागिने जमा केले आणि कारमधून ते पळून गेले.

अर्धा किलो सोने, १३ किलो चांदी..

दरोडेखोरांनी सराफा दुकानातील अर्धा किलो सोने आणि १३ किलो चांदीचे दागिने लंपास केल्याची माहिती सराफा व्यावसायिकाने दिली आहे. दरोडेखोरांनी गोविंद याचा मोबाईल देखील आपल्या जवळ ठेवून घेतला होता, त्यामुळे तो काहीच करू शकला नाही. दरोडेखोर पळून जात असताना गोविंद याने आरडाओरड केला, त्यामुळे परिसरातील लोक धावून आले, पण दरोडेखोर अत्यंत वेगाने कारमधून पळून गेले. या घटनेमुळे दर्यापूर शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

यापुर्वीही घडल्या अनेक घटना

सराफा दुकानात चोरीच्या अनेक घटना दर्यापूर शहरात घडल्या आहेत, पण बंदुकीचा धाक दाखवून टाकलेल्या दरोड्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावरून आरोपींचा काही सुगावा लागतो, या दृष्टीने तपास सुरू आहे.