अमरावती/चंद्रपूर : रविवारच्या सुट्टीनंतर आज, सोमवारी दुपारी अमरावती आणि चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयांत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना न्यायालयांच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश एका ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. न्यायालय प्रशासनांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाच्या मुख्य इमारतींसह इतर विभागांतील न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या पक्षकारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. या ई-मेलमुळे अमरावती आणि चंद्रपूर जिल्हा न्यायालय प्रशासन आणि पोलीस यंत्रणांना चांगलीच धावपळ करावी लागली.

राज्यातील इतर न्यायालयांमध्येही ई-मेल

राज्यातील बीड, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे. अमरावतीतही अशाच प्रकारचा ई-मेल प्राप्त झाल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त श्याम घुगे, यशवंत सोळंके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि जलद प्रतिसाद पथक (QRT) न्यायालय परिसरात पोहचले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाने संपूर्ण परिसराला घेराव घातला.

प्रत्येक कक्षाची तपासणी

पोलिसांनी न्यायालयाच्या पाच मजल्यांवरील प्रत्येक दालनाची तपासणी सुरू केली. इमारतीचे प्रवेशद्वार बंद करून प्रत्येक कोपरा, वाहनांचे पार्किंग, संशयित बॅगांची तपासणी हाती घेण्यात आली. अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी दाखल झाले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे न्यायालयात उपस्थित असलेल्या वकील आणि पक्षकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस पथक तातडीने न्यायालय परिसरात

अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्राप्त झाल्याची माहिती आहे. असा संदेश प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला. न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. न्यायालयाच्या जवळच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालये असल्याने या घटनेविषयी चर्चा सुरू झाली.

ई-मेलची चौकशी होणार

हा ई-मेल कोणी आणि कोठून पाठवला. हा एखाद्या कटाचा भाग आहे का किंवा खोडसाळपणा, याबाबत पोलीस अथवा न्यायालय प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. केवळ बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश न्यायालयाला प्राप्त झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सायबर सेलच्या मदतीने सुगावा शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

चंद्रपुरात तीन तास तपासणी, बॉम्बशोधक व श्वान पथकाकडून झाडाझडती

धमकीच्या ई-मेलबाबत माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि दहशतवादविरोधी पथकाने चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या संपूर्ण इमारतीची तब्बल तीन तास कसून तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, धमकीचा ई-मेल कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठविण्यात आला, याचा शोध सायबर सेल घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल कोचारे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील वकील, पक्षकार, कर्मचारी आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. परिसरात नाकेबंदी करून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश रोखण्यात आला. त्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाने इमारतीच्या प्रत्येक मजल्याची, दालनांची तसेच कानाकोपऱ्याची तपासणी केली. तीन तासांच्या शोधमोहिमेनंतरही काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे पोलिसांसह न्यायालय प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. धमकीचा संदेश कोणी आणि नेमका कुठून पाठविला, याचा तांत्रिक तपास आता सायबर सेलच्या माध्यमातून सुरू आहे.