अमरावती : संपूर्ण राज्यभरात चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणात आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणातील १९ वर्षीय मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला साथीदाराला देखील अटक केली आहे.

आरोपींनी आठ अल्पवयीन मुली आणि महिलांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो समाज माध्यमांवर प्रसारीत केल्याचे तपासात समोर आले आहे. यात काही मुस्लीम तरूणींचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

प्यारे खान काय म्हणाले?

परतवाडा येथे उघडकीस आलेले प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पीडितांमध्ये काही मुस्लीम तरूणींचाही समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, यासाठी एसआयटी गठित केली पाहिजे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाने तत्काळ पावले उचलली असून आयोगाचे पथक उद्या परतवाडा येथे भेट देऊन या प्रकरणी चौकशी करणार आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जाईल.

मुस्लीम संघटनांची प्रतिक्रिया काय?

येथील अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल कृत्य करणारा अयान अहमद तनवीर अहमद व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना भर चौकात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मुस्लीम संघटनांनी केली. काजी म्यासूद्दीन यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ही मागणी केली. हे प्रकरण पुढे आल्यानंतर मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी केली. या पदाधिकाऱ्यांच्या मते या प्रकरणाशी अनेक धागेदोरे जुळले आहेत. अयानने केलेले हे कृत्य समाजासाठी घातक आहे.

कठोर कारवाईची मागणी

पोलिसांनी मुलींचे अश्लिल व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी. जाती धर्माचा विचार न करता नराधम म्हणून शिक्षा व्हावी, अशी मागणी या वेळी मुस्लिम संघटनांनी केली मुस्लीम पदाधिकाऱ्यांच्या मते दोषी वर कारवाई कशी होईल, यासाठी प्रयत्न करावे. एसआयटी गठित करून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शुभम कुमार यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले. दरम्यान आज आरोपी अयाज अहमद याच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.