अमरावती: शहरातील नया अकोला परिसरात नामांकित ब्रँडच्या नावावर बनावट साबण आणि डिटर्जंट पावडरची निर्मिती करणाऱ्या टोळीचे प्रताप उघड झाले आहेत. सर्वाधिक खप असलेल्या ब्रँडचे हुबेहुब पॅकिंग तयार करून त्यात बनावट डिटर्जंट पावडर मिसळण्याचे आणि साबण बनविण्याचे काम दोन कारखान्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. पोलिसांनी या कारखान्यांवर छापा टाकून सुमारे ७१.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमके प्रकरण काय?
या कारखान्यात कॉस्टिक सोडा, वेगळ्या प्रकारचे मीठ, डोलोमाइट नावाचे रसायन आणि एक द्रव पदार्थांचा वापर करून डिटर्जंट पावडर आणि साबण तयार केले जात होते. तयार झालेल्या या बनावट उत्पादनांना नामांकित कंपन्यांच्या लेबल्सखाली याच कारखान्यातील यंत्रांच्या मदतीने पॅकिंग करून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात होती. ब्रँडेड लेबल्समुळे ग्राहक कोणतीही शंका न घेता हे उत्पादने खरेदी करत होते. मात्र प्रत्यक्षात अमरावतीकरांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे उघड झाले.
चार जणांना अटक
जुनेद खान यासीन खान (२८, रा. पाकीजा कॉलनी, अमरावती) याने हा कारखाना सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारखान्याचा मूळ मालक वेगळाच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू आहे. याचवेळी त्याच्यासोबत पोलिसांनी त्या ठिकाणी काम करणारे प्रफुल विष्णुपंत डोईफोडे (४८, न्यु म्हाडा कॉलनी, अकोली), शेख भुरू शेख मुनीर (५०, झोंडा चौक, अमरावती) आणि शेख कलीम शेख माजीद (४०, रा. बिस्मील्ला नगर, अमरावती) या तिघांनाही पकडले आहे.
गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही कारखान्यांमधून चौघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांना कारखाना चालविण्याच्या परवान्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांच्याजवळ कुठलाही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे पथकाने दोन्ही कारखान्यांमधून पावडर व साबणचे पोते, कच्चा माल, पॅकिंग मशीन, इलेक्ट्रिक वजन काटा, विविध साबण व नामांकित कंपन्यांच्या लेबल्स आणि इतर साहित्य असा एकूण ७१ लाख २० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी मुद्देमाल कोठून आणला व कुठे विक्री करीत होते, याबाबत तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, गजानन ठेवले, मनोज ठोसर, प्रशांत मोहोड, विशाल वाकपांजर यांनी केली.
